स्वर्ग आणि नरकाच्यावर असलेला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 08:54 AM2019-08-30T08:54:36+5:302019-08-30T09:18:18+5:30
शेतक-याला जरी ‘जगाचा अन्नदाता’ म्हणतात तरी अनेक शेतकरी राबराब राबूनही कुटुंबासाठी दोन वेळचं अन्न मिळवू शकत नाहीत.
- रमेश सप्रे
कोंडीबा हा अत्यंत गरीब शेतकरी होता. शेतक-याला जरी ‘जगाचा अन्नदाता’ म्हणतात तरी अनेक शेतकरी राबराब राबूनही कुटुंबासाठी दोन वेळचं अन्न मिळवू शकत नाहीत. कोंडीबाची आर्थिक परिस्थिती गरीबीची असली तरी मन:स्थितीच्या बाबतीत मात्र तो खूप श्रीमंत आणि उदार होता. स्वत: उपाशी असला तरी हातातला घास दुस-या भुकेल्या माणसालाच काय कुत्र्या-मांजरांना द्यायलाही तो मागेपुढे पाहात नसे.
वृत्तीने कोंडीबा अतिशय सात्विक होता. दिवसातून मन:पूर्वक चारवेळा देवाला नमस्कार करायचा आणि त्याचे आभार मानायचा. सकाळी उठल्यावर, दुपारी शिदोरी खाताना, संध्याकाळी शेतातून परतल्यावर आणि रात्री झोपताना असे चार नमस्कार करताना त्याच्या मनात देवाविषयी (दैवी शक्तीविषयी) कृतज्ञतेचा नि शरणतेचा भावच असायचा. कोंडीबाचं असं समाधानी जीवन सुरू होतं. हे सारं तसं सुरळीत चालू असताना तिकडे सैतान नि त्याच्या राज्यातील एक इमानदार भूत (सेवक) यांच्यात संवाद चालू होता.
भुताला हवी होती बढती (प्रमोशन) त्यावर सैतानाचं म्हणणं होतं मी प्रभावित होईल अशी कामगिरी करून दाखव. म्हणजे एका सदाचारी सज्जन माणसाचा अध:पात घडवून त्याला देवाचा विरोधक बनवायचं. देव आणि सैतान यांच्यात श्रेष्ठत्वाबद्दल सतत स्पर्धा चालू असे. सत्संग, भक्ती, उपासना यांच्या माध्यमातून माणसांना सदाचारसंपन्न, सुसंस्कृत बनवून स्वर्गात आणणे, जिवंत असताना त्यांचा प्रवास स्वर्गाच्या दिशेनं सुरू ठेवणं हे देवाचं कार्य होतं. त्याचवेळी लोकांना निरनिराळी व्यसनं लावून त्यांना भ्रष्टाचारी, हिंसाचारी बनवून पाप करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांचा पापांच्या माध्यमातून नरकाचा मार्ग सोपा करायचा, त्यांचा अध:पात घडवायचा हे कार्य सैतान नि त्याने भूत-पिशाच्च असे नोकर चालू ठेवत असत. ज्यावेळी एका भुतानं बढतीचा आग्रह धरला तेव्हा सैतानानं त्याला त्या सदाचारी कोंडीबाला बिघडवण्याची, पापं करायला प्रवृत्त करण्याची नि आपल्या राज्याचा नागरिक बनवण्याची कामगिरी यशस्वी करायला सांगितली.
आपण हे सहज करू शकू या फाजिल आत्मविश्वासाने त्या भुतानं दुस-या दिवशी शेतक-यानं म्हणजे कोडींबानं शेताच्या कामावर असताना दुपारच्यावेळी खाण्यासाठी आणलेली शिदोरी पळवली. कोंडीबा भुकेपोटी चोराला शिव्याशाप देईल, त्या पापातूनच त्याचा नरकाचा प्रवास सुरू होईल असा त्या भुताचा विश्वास होता; पण प्रत्यक्षात घडलं उलटच. दुपारी कोंडीबा येऊन पाहतो तो त्याला शिदोरी दिसली नाही. त्यानं इकडे तिकडे शोध घेतला पण शिदोरी काही मिळाली नाही; त्यानं मग शांतपणे प्रार्थना केली. ‘हे परमेश्वरा, ज्यानं कुणी माझी शिदोरी नेली असेल त्याला त्याची अधिक गरज असेल. त्याचं कल्याण कर’ त्यानंतर विहिरीचं पोटभर पाणी पिऊन पुन्हा शेतकामाला लागला.
भुतानं हा सारा वृत्तांत सैतानाला सांगितल्यावर तो भयंकर चिडला. त्यानं भुताला धमकी दिली. ‘अजून एकच संधी देतो. यावेळी जर त्या सत्प्रवृत्त शेतक-याला नरकाच्या दिशेनं वळवलं नाहीस तर बढती सोड, मी तुला गंगेच्या पवित्र पाण्यात बुडवून काढीन.’
घाबरून भूत म्हणालं ‘तेवढं मात्र करू नका. अजून एक संधी नि पुरेसा वेळ द्यावा मला’ सैतानाची संमती मिळाल्यावर भूत पृथ्वीवर आलं नि एक योजना तयार करून कोंडीबाकडे नोकरी मागायला आलं. दोन वेळचं जेवण नि राहायला जागा एवढंच कोंडीबा देऊ शकत होता. याच्या बदल्यात त्या वेश बदलून आलेल्या भुतानं कोंडीबाची सेवा करायची असं ठरलं.
भुताला असलेल्या अतींद्रिय ज्ञानामुळे त्याला हवामानाचा, विशेषत: पावसाचा अचूक अंदाज करता येत होता. त्याचा उपयोग करून त्यानं पहिल्या वर्षी अतिवृष्टी होणार असल्यामुळे डोंगराच्या उतारावरचं बाजरी, नाचणी यासारखं पीक घ्यायला मालक कोंडीबाला सांगितलं. इतरांची पिकं कुजून मेली. कोंडीबाकडे खूप धान्य आलं. ते भांडारात भरून ठेवलं. पुढच्या वर्षी पाऊस अगदी कमी पडेल म्हणून भुताच्या सांगण्यावरून भाताचं पीक पाणथळ भागात लावलं. इतरांची पीकं जळून गेली. कोंडीबाकडे खूपच धान्य साठलं.
भुतानं त्या धान्यापासून ते आंबवून दारू कशी गाळायची ते कोंडीबाला दाखवलं. आता कोंडीबा त्या गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. मित्रांना बोलवून दारू पिणं, एकमेकांना शिव्या देणं, कधी खोटी स्तुती करणं असे प्रकार सुरू झाले. बायकोमुलांना दारूच्या नशेत शिव्या देणं, कधी खोटी स्तुती करणं असं सुरू झालं. बायकोमुलांना दारूच्या नशेत शिव्या देणं, लाथांनी तुडवणं सुरू झालं. थोडक्यात कोंडीबा ब-यापैकी नरकात जाऊन सैतानाच्या राज्याचा नागरिक बनायला योग्य झाला.
संधी साधून भुतानं सैतानाला बोलवून सारा प्रकार प्रत्यक्ष दाखवला. ते पाहून सैतानानं विचारलं, ‘हाच का तो शेतकरी ज्याची शिदोरी पळवल्यामुळे उपाशी राहण्याची पाळी येऊन हा शांत, संयमी, राहिला?’ भुतानं ‘हो’ म्हणताच सैतानानं त्याला लगेच बढती दिली.
एका समाधानी, आनंदी व्यक्तीच्या जीवनाची नि कुटुंबाची अशी अधोगती होण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त संपत्तीमुळे देहाचे उपभोग घेण्याची नि त्यासाठी वाटेल ते पाप करण्याची, वाटेल तसं स्वैर वागण्याची वृत्ती.
खरंच देहाच्या सुखोपभोगाच्यावर असलेला आनंद कशावरही अवलंबून नसतो. असा आनंद सर्वत्र सदैव उसळत असल्याने तो मिळवणं हा आपला विशेष अधिकार आहे तो आपण मिळवूयाच.