(Image Credit : dsource.in)
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर तीन दिवसांनी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी गौरींचं आगमन झालं. त्यामुळे घरोघरी उत्सवाचं वातावरण आहे. तीन दिवस चालणारा हा उत्सव विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अगदी उत्साहात साजरा केला जातो. महालक्ष्मी किंवा ज्येष्ठागौरी पूजन कधी करावे? गौरीची आरती आणि विसर्जनाची वेळ हे जाणून घेऊ...
मुहूर्त
पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की, २५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०१ वाजून ५८ मिनिटांनी अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट २०२० रोजी गौरी पूजन केले जाणार आहे. तर मूळ नक्षत्रावर गुरूवारी दुपारी १२.३७ वाजता नंतर विसर्जन करावे. दाते म्हणाले की, जेष्ठा नक्षत्र मध्यान्ह असलेल्या दिवशी गौरी पूजन करावे म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे. गौरी आवाहन किंवा विसर्जनासाठी ठराविक वेळेची मर्यादा नसते, पण यावर्षी आवाहन आणि विसर्जनासाठी मर्यादा दिलेली आहे.
गौरी-महालक्ष्मीचे महत्व
असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
(Image Credit : flickr.com)
रिद्धी आणि सिद्धी यांसह कार्यरत असणारे गणेशतत्त्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने उपासकाला गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होतो. महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात.
गौरीची आरती
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा, अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा ।गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा ।।१।।जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी ।कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेवी जयदेवी ।। धृ।।ज्येष्ठा नक्षत्र पूजेचा महिमा, षडरस पक्वान्ने होती सुखधामा ।सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी।।उत्थापन मूळावर होता अगजाई, वर देती झाली देवी विप्राचे गृही ।रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी, वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।।। जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी।।
गौरी किंवा महालक्ष्मीचे विसर्जन
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे किंवा महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची- महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या- महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.