वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. कोजागरी पौणिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहेत. एकेकाळी सर्व गावकरी, परिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. परंतु अलिकडच्या काळामध्ये काकडा आरतीमधील गर्दी ओसरू लागली आणि काकडा आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरूष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकडा आरती करतात.गावांमध्ये काकडा आरतीमध्ये टाळ, मृदूंग, चिपड्यांच्या तालावर भजने सादर होतात. आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून, स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी. आरोग्य सुढृढ राहावे. असाही काकड आरतीमागील उद्देश असू शकतो. त्यामागे आरोग्यविषयक भावना निश्चितच दडलेली आहे.परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टीकोनातूनच पाहतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक जय जय रामकृष्ण हरी...चा गजर करीत, टाळमृदूंगाच्या तालात नगराला प्रर्दक्षिणा घालतात. चातुमार्सात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठी ही काकड आरतीचे परंपरा असल्याचे बोलले जाते. आरती दरम्यान तीन मंगलाचरण, काकड आरतीचे अभंग, भूपाळ्याचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव, आंधाळा पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप होते. पांडूरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते. अशा काकडा आरतीची २२ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होते.