कर्मयोगी श्री संत सावता महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:35 PM2018-11-13T12:35:53+5:302018-11-13T12:35:59+5:30

श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन महान संत होते.

 Karmayogi Shri Saints Savta Maharaj | कर्मयोगी श्री संत सावता महाराज

कर्मयोगी श्री संत सावता महाराज

googlenewsNext

श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन महान संत होते. ‘कर्मे इशू भजावा ।’ या माऊलीच्या ओवीप्रमाणे जीवन जगणारे होते. त्यांचा काल साधारणपणे इ.स. १२५० ते समाधी इ.स.१२९५ असा मानला जातो. अरण, तालुका-माढा, जिल्हा-सोलापूर हे त्यांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील. ते पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे सुद्धा वारकरी होते. परंपरेने जसे वारकरी होते तसेच अनुवांशिक शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावता महाराजांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच आहे. सावता महाराजांचे भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यांनी उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. लोकभाषेचा वापर केला तरच या सामान्य समाजाला तत्वज्ञाची उमज येते अन्यथा ते बोजड होते. तत्कालीन मराठी काव्यामध्ये, भाषेत नव्या शब्दांची, नव्या अलंकाराची भर पडली. सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरव यांनी लिहून ठेवले.
साव म्हणजे शुद्ध, पवित्र. महाराज नावाप्रमाणे होते. स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयाव:।। या गीतेतील श्लोकाप्रमाणे त्यांची जीवनशैली होती. आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग करावे त्यात टाळाटाळ करणे म्हणजे अधर्म होय. म्हणून त्यांनी कधीही पंढरपूरची वारीही केली नाही. कारण अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती. ‘स्वकर्मात व्हावे रत। मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, प्रपंच साधूंनी परमार्थ केला । तो नर भला भला रे भला भला ।। असे एका कवीने म्हटले आहे. ते सावता महाराजांच्या जीवनात यथार्थ लागू पडते. यातून त्यांची जीवननिष्ठा दिसून येते. छांदोग्य उपनिषदात नारद सनत्कुमारांच्या संवादात असे म्हटले आहे कि ‘यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति, भूमैव सुखं भूमा त्वेव विजिज्ञासितव्य:।’ व्यापकत्वातच सुख आहे अल्पत्वत सुख नसते आणि व्यापक एक ब्रहम आहे. तदभिन्न सर्व मिथ्या असते. तो परमात्मा सर्वत्र आहे. फक्त तशी दृष्टी असावी लागते. प्रत्येक भूतमात्रात एक भगवंतच आहे. हे एकदा कळले कि मग त्याने मंदिरात जावो अथवा न जावो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘मग तू राहे भलत्या ठायी । जनी वनी खाटे भुई ।। तो कुठेही राहिला तरी त्याच्या जीवन्मुक्तीमध्ये काहीही फरक पडत नाही. वारी करूनही जर आत्मदृष्टी आली नाही तर ती वारी म्हणजे फक्त येरझार ठरते. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव । देव अशाने भेटायचा नाही रं । देव बाजाराचा भाजीपाला नाही रं ।। हे राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांचे म्हणणे एकदम खरे आहे म्हणून सावता महाराज पंढरीला गेले नाही व त्यांना ती आवश्यकताही नव्हती. त्यांनी तो भाव त्यांच्या अभंगात प्रगट केला आहे. ‘आमुचि माळियाची जात, शेत लावू बागाईत १।। आम्हा हाती मोट नाडा, पाणी जाते फुलझाडा २।।शांती शेवंती फुलली, प्रेमे जाईजुई उगवली ३।। सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा ४।। किंवा कांदा,मुळा,भाजी अवघी विठाबाई माझी १।। लसून, मिरची, कोथंबिरी अवघा झाला माझा हरी २।। मोट नाडा विहीर दोरी, अवघी व्यापली पंढरी ३।। सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोविला मळा, माळ्याच्या जातीत जन्माला आलेलो आहे व आमचे कर्तव्य म्हणजे शेती करणे, शेतकरी खरे तर अन्नदाता आहे. तो बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवतो व प्रथम प्राधान्य शेतीला देतो अगदी तुकाराम महाराजही म्हणतात. मढे झाकोनिया करिती पेरणी । कुणबियाची वाणी लवलाही ।। कर्तव्य कर्म चुकवायचे नाही हि संतांची ग्वाही आहे. सावता महाराजांनी शांतीरुपी शेवंती फुलवली, प्रेमरूपी जाई उगविली लसूण मिरची, कोथंबीरीमध्ये त्यांनी त्या व्यापक हरीला पाहिले त्यांची पंढरी व्यापक होती एकदेशी नव्हती. तुका म्हणे आम्हा ब्रह्माण्ड पंढरी । सावता महाराजांनी जसा भौतिक मळा केला तसा अध्यतिमीक क्षेत्रात भक्तीचा मळा केला व जगाला व्यापकत्वाचा आदर्श घालून दिला. हि त्यांची प्रतिभ अनुभूती होती त्यामुळे त्यांना पंढरीला जाण्याची आवश्यकता नव्हती. अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढली. बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद करायला लावली. सावता महाराजांच्या मळ्यात ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराजा आदि तत्कालीन सर्व संत यायचे व तेथे संत मेळावा भरायचा. अध्यात्मिक सवांद व्हावयाचे. नामदेव महाराजांचे कीर्तन महाराजांच्या मळ्यात होत होते. त्या सर्वांचा एकोपा होता. कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. किंबहुना शांतीचा संदेश या संत मेळाव्यातून जात असे. आता मात्र संत सुद्धा एकत्र येणे अवघड होत आहे. विविध पक्षाचे सुद्धा संत महंत झाले आहेत, हे दुर्दैव आहे.
भगवतगीतेमध्ये म्हटले आहे. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । २/३८ अगदी याचप्रमाणे सावता महाराज जीवनाचा सहज सोपा सिद्धांत सांगतात समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार।। कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥ कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य । कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥ कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन । कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥ तुकाराम महाराजहि हेच सांगतात ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। संतांची सर्वत्र एकवाक्यता असते परंतु आता मात्र समाजात चित्र वेगळे दिसू लागले आहे जातीयवाद भयानक वाढला आहे. सर्व क्षेत्रात जातीभेदाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. अगदी संतांना सुद्धा जाती जातीमध्ये विभागून ठेवले आहे हे विदारक आहे. संत दिसती वेगळालेले । परी ते स्वरूपी मिळाले ।। वारकरी संतांनी एकात्मकतेचा संदेश दिला आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज वयाची ४५ वर्षे या अवनितालावर राहिले व त्यांनी इ. स. १२९५ साली आषाढ कृ. १४(१०-८-१८) या दिवशी निजधाम गमन केले. अशा या कर्मयोगी महात्म्याला अंनत कोटी दंडवत.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम चिचोंडी (पा)ता.नगर
मोबाईल :- ९४२२२२०६०३



 

Web Title:  Karmayogi Shri Saints Savta Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.