- ब्रह्मकुमारीएक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडाचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हा साठा कसा संपेल. उत्तर येतं की, एखादी खूप मोठी व्यक्ती जर मेली तर या लाकडाचा उपयोग होऊ शकेल. राजा (त्याचा मित्र) जर तोच वारला तर... मनामध्ये या विचारांचे वारे वाहू लागतात.एकीकडे हेसुद्धा जाणवते की, मी असा विचार कसा करू शकतो? जेव्हा कधी त्या दोघांची भेट होत असे, मित्राच्या मनात राजाच्या मरणाचे विचार सुरू व्हायचे. तिथे राजालासुद्धा विचार यायला लागले की, माझा मित्र इतका पैसा कोणासाठी व का कमावतोय? त्याला तर कोणी वारस नाही. याचा मृत्यू झाला, तर याची कमाई माझ्या खजिन्यात जमा होईल. याचा मृत्यू कसा होईल. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे विचार सुरू होतात. एक दिवस दोघ भेटतात, तेव्हा न राहवून मित्र आपल्या मनातले भाव राजासमोर ठेवत त्याची माफीही मागतो. राजा सर्व ऐकल्यानंतर मित्राचीसुद्धा माफी मागतो.लोभापायी आपल्या जीवलग मित्राचा मृत्यू व्हावा, ही भावना त्यांना लाजीरवाणी करते. राजा सांगतो की, मी तुझ्या लाकडांना विकत घेऊन मंदिर बनवतो व तुला त्याचे भरघोस पैसे देतो. यावर मित्र म्हणतो की, राजा हे पैसे मला देण्याऐवजी मंदिराची आरास, तसेच मूर्तीच्या स्थापनेत ते लावावे. अशा पद्धतीने दोघांनी आपली भावना शुद्ध करून मंदिर बनविण्याची हमी भरली. सारांश असा की, मनातील प्रत्येक शुभाशुभ विचार व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्याची प्रतिक्रिया समोरून त्याच पद्धतीने होते. म्हणून शब्दांवर जसे आपले लक्ष असते, तसेच विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे.
शुभाशुभ विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:00 AM