ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:15 PM2019-05-26T17:15:36+5:302019-05-26T17:15:58+5:30

: विज्ञान आणि तत्त्वज्ञान यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. ही काळाची गरज आहे. पूर्णवाद ग्रंथाची निर्मितीच याचसाठी करण्यात आलेली आहे.

Knowledge, Science, and Philosophy | ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान

ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान

googlenewsNext

अहमदनगर : विज्ञान आणि तत्त्वज्ञान यातील फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. ही काळाची गरज आहे. पूर्णवाद ग्रंथाची निर्मितीच याचसाठी करण्यात आलेली आहे. ज्ञान आणि विज्ञान या दोहोंची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. ‘विज्ञानाच्या भुते मारला मानव’, असे डॉ. रामचंद्र महाराज यांचे वचन आहे. तेराव्या शतकात विज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला. आधी वेद. त्यानंतर उपनिषदे, ऐतिहासिक तत्त्वज्ञान या सर्वांचा अभ्यास टप्प्याटप्प्याने करायला हवा. तत्त्वज्ञानाचा संबंध जीवनाशी आहे. पूर्णवादामध्ये तर्कशुद्ध विचार मांडले आहेत. जसा माणूस बोलतो तसा तो नसतो. म्हणून आपणही फसतो. अगतिकता ही माणसाला खाईट लोटते. बुद्धी असून त्याचा उपयोग होत नाही. व्यावहारिकतेला विचाराची जोड देण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञानात उत्तम प्रतिके निर्माण झाली.
प्राईड, डार्विन, कालमार्क्स या तत्त्ववेत्त्यांनी जे अभ्यास मांडले ते अभ्यास महत्त्वाचे आहेत. विज्ञानामुळे एक प्रकारची जागृती येत असते. इस्त्रायलमधील भींत आणि ज्ञानेश्वरांनी चालवलेली भींत यातील फरक आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. अनुभव घेतल्याशिवाय लिहिता येत नाही आणि कलेशिवाय शास्त्र नाही. कला आणि शास्त्र हे वेगवेगळे असले तरीही त्याच्यातही एकजिन्सीपणा आहे. स्वयंप्रेरणा म्हणजे विचारांनी पुढे सरकणे. ईश्वराबद्दलची जिज्ञासा ही प्रत्येकाला असली पाहिजे. जीवन हे अमूल्य आहे, परंतु त्याची किंमत कुणालाही नाही. माणसाने देवत्त्व सिद्ध करावे. बुद्धीची पत वाढवावी. देव माझा, मी त्याचा, अशी जर भावना असेल तरच उपासना करता येते. मनाला येईल तसे वागणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. जीवनात फसवेपणा नको तर मोकळेपणा हवा. मी जे करेल ते जिद्दीने करेल आणि पूर्णत्त्वाने जगेल अशी जिद्द प्रत्येकाने ठेवली पाहिजे. त्यामुळे जीवनाचे मूल्यांकन वाढते.
एखाद्या माणसाला जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी स्मृती असणे आवश्यक आहे. स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्ती या दोन्हीही त्यासाठी आवश्यक आहेत. ही दोन्ही भावंडे आहेत आणि त्याच्यापुढे विचारशक्ती महत्त्वाची आहे.
काही दार्शनिक साहित्यिक झाले. तर काही संत झाले. ज्ञानेश्वर हे दोन्हीही आहेत. म्हणूनच ते ‘अमृताते ही पैजा जिंके’ असे आव्हान स्वीकारतात. संस्कृतमध्ये असलेली ‘ज्ञानेश्वरी’ सर्वसामान्यांना कळावी म्हणून निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्यांनी ती मराठीत लिहिली. मात्र, कुठेही ज्ञानेश्वर या नावाचा उल्लेख नाही. तर ‘निवृत्तीदास म्हणे’ असा उल्लेख आहे. पंधराव्या वर्षी ज्ञानेश्वर जर तत्त्वचिंतक झाले.
‘स्मृती’ हा विषय स्मरणशक्तीचा आहे, तर स्मरणशक्ती ही निरीक्षणाशी जोडलेली आहे. त्यानंतर विचारशक्ती येते. स्मरणशक्ती आणि निरीक्षणशक्ती ही जुळी भावंडे आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे इंग्रजीवर एवढे प्रभुत्त्व होते की, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या इंग्रजांनाही डिक्शनरी घ्यावी लागत असे. शब्दसंपत्ती असलेल्या माणसालाच विचाराच्या आकाशात उडता येते. समाजशास्त्राच्या अभ्यासात हे सर्व शब्द असणे आवश्यक आहे. माणसाला नाव असते, परंतु स्वरूप त्याला ठरवावे लागते. म्हणूनच त्यासाठी निश्चय लागतो. निश्चयातून स्वरुपाची निर्मिती होते. एखादी व्यक्ती पाहताच त्याचे स्वरूप आपल्याला समजते हा निरीक्षणाचा भाग आहे. परंतु आजकाल निरीक्षणापेक्षाही परीक्षणच जास्त केले जाते. ज्ञानेश्वरांनी विनयतेची शाल पांघरली होती.
ज्ञानेश्वरांनी संवेदनाला जास्त महत्त्व दिले आहे. त्याचा अभ्यास करा असे ते म्हणतात. पाश्चिमात्य विचारवंतानाही अस्तित्त्व म्हणजे काय, असा प्रश्न पडला होता. स्वसंवेदना म्हणजे तुमच्या मनातील संवेदना आहे. माझे ज्ञान काय, समोरचे ज्ञान काय याच्या जाणीवा होणे आणि ते ज्ञान झाले. शब्दाशिवाय कुणालाही व्यक्त होता येत नाही, म्हणूनच ॐ या शब्दाचे महत्त्व आहे. जेव्हा ह्रदय भरून येते तेव्हा बोलता येत नाही. पण आपल्याला भावना व्यक्त करता येतात, त्यालाच संवेदना असे म्हणतात. जाणीव, विचार यातूनच कृती निर्माण करावी लागते. पूर्णवाद अंतरंगाचाही अभ्यास करतो आणि विश्वाचाही अभ्यास करतो. ज्ञानेश्वरांना आद्य माहिती होते. वेदाची अभिव्यक्ती ॐ आहे. ती प्रामाणिकपणाची पावती ते सांगतात आणि आद्य म्हणून त्याला नमनही करतात. ज्ञानेश्वरांना लहान होता आले. त्यांच्यात विनयता होती म्हणून. विषयाची ओळख असेल तरच अभ्यासाची मांडणी करता येते. ज्ञानेश्वरांची गुरूबद्दलची निष्ठा आणि भूमिका नम्र होती. त्यामुळे त्यांनी निवृत्तीनाथांना जास्त महत्त्व दिले. ज्याला वाद नाही तेच निर्विवाद आहेत. पूर्णवाद हे पूर्णसत्य आह. पूर्णत्त्व हेच केवळ शुद्ध सत्य परमेश्वर आहे.

अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर
गुरुवाडा ता. पारनेर, जि.अहमदनगर

 

Web Title: Knowledge, Science, and Philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.