इस्लामच्या तत्त्वज्ञानाचे दोन प्रमुख व अंतिम स्त्रोत कुरआन व हदिस आहेत. कुरआनविषयीची माहिती आपण गत लेखात पाहिली आहे. हदिस म्हणजे प्रेषितांची वचने आहेत. एखाद्या विशिष्ट प्रसंगात प्रेषितांनी कोणता निर्णय घेतला? त्यांनी इस्लामी धार्मिक विधी कशापध्दतीने पूर्ण केल्या? न्यायालयीन प्रकरणात कशा पध्दतीने निवाडा केला? अशा अनेक बाबींचा समावेश हदिसमध्ये होतो.
कुरआनमधील विचारांच्या स्पष्टीकरणासाठी हदिस महत्त्वाचे स्त्रोत मानले जाते. हदिस हा मूळ अरबी शब्द आहे. हदिस हा शब्द हदिथ असादेखील उच्चारला जातो. अहादिस हे त्याचे बहुवचन आहे. प्रेषितांचे विशिष्ट प्रसंगावरील विचार त्यांचे सहकारी मुखोद्गत करत किंवा लिहून ठेवत. प्रेषितांच्यानंतर इस्लामी खिलाफतीच्या काळात या विचारांचे, वचनांचे संकलन करण्यात आले. प्रेषितांच्या वचनांचे संकलन असणारे सहा प्रमुख हदिस ग्रंथ आहेत. साधारणत: त्यांच्या संकलकांच्या नावाने ते ग्रंथ ओळखले जातात. या ग्रंथांपैकी सहि बुखारी हे प्रमुख ग्रंथ आहे. त्यातील हदिसचे संकलन अबु अब्दुल्लाह मोहम्मद बीन इस्लामाईल बुखारी यांनी केले आहे. त्या ग्रंथात एकूण ७२२५ हदिस आहेत.
इस्लाममधील जवळपास सर्वच पंथांतील मुसलमान सहि बुखारी हा ग्रंथ प्रमाण मानतात. बुखारींच्यानंतर ‘सहिह मुस्लिम’ या ग्रंथातील हदिसचे संकलन मुस्लिम बिन अल हज्जाज यांनी केले आहे. त्यामध्ये एकूण ४००० हदिस आहेत. ‘सुनन अल तिर्मिजी’ हा ग्रंथदेखील हदिसच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे. त्याचे संकलनकर्ता अबू ईसा मोहम्मद बिन ईसा तिर्मिजी हे आहेत. त्या ग्रंथात ३८९१ इतक्या संख्येत हदिस संकलित केल्या आहेत. या तीनही प्रमुख ग्रंथांप्रमाणेच ‘सुनन अबु दाऊद’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. या ग्रंथात ४८०० हदिस आहेत. हदिस संकलनातील पाचवा ग्रंथ ‘सुनन इब्ने माजा’ हा आहे. याचे संकलन मोहम्मद बीन यजीद बीन माजह यांनी केले आहे. या ग्रंथात ४००० हदिस आहेत. हदिस संकलनातील सहावा ग्रंथ ‘सुनन अन नसाई’ हा आहे. याचे संकलक अबु अब्दुर्रहमान शोएब बिन खुरासानी हे आहेत. या ग्रंथात ५६६२ इतक्या हदिस आहेत. प्रेषितांच्या हदिसच्या आधारे जगाच्या अनेक देशात न्यायनिवाडे केले जातात.
इस्लामच्या विधींचे स्वरुप स्पष्ट करण्यासाठीदेखील हदिसचा आधार घेतात. सामान्य माणसाविषयी प्रेषित काय विचार करायचे, हे हदिसच्या माध्यमातून स्पष्ट होते. ते मुसलमनांचे व्यक्तिमत्त्व नैतिक मूल्यांना प्रमाण मानणारे असावे यासाठी आग्रही होते. त्यांच्या अनेक वचनांतून याचे प्रमाण मिळतात. अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेषितांनी म्हटले आहे की, कोणीही ईश्वराने पूर्ण केलेली मुदत पूर्ण केल्याशिवाय मृत्युमुखी पडणार नाही. ऐका, ईश्वराचे भय बाळगा. आपली उपजीविका मिळवताना रास्त मार्गाचा अवलंब करा. प्रेषितांनी सातत्याने श्रीमंतांनी गरिबांना मदत करावी यासाठी प्रोत्साहित केले. प्रवासात श्रीमंत सहप्रवाशाकडून गरिबास घोडा मिळवून देत. त्याचा प्रवास सुकर करत. तर कधी त्याच्याकडून भोजन घेऊन प्रेषित गरिबांमध्ये वाटत असत. सामाजिक अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था व त्यातील सामान्य माणसाचे स्थान याविषयी प्रेषित मोहम्मद (स.) हे खूप संवेदनशील होते.- आसिफ इक्बाल