आलस्य दवडावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 05:05 AM2020-02-11T05:05:49+5:302020-02-11T05:05:52+5:30
आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. ...
आळशी लोक नेहमीच नशिबाला दोष देतात. आम्हाला संधी मिळाली तर मोठा पराक्रम करू, अशा वल्गना करण्यातच त्यांचा वेळ जातो. केवळ बोलाचा भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्षात काही करायचेच नाही. शिवाय समाजातील यशस्वी लोकांचा मत्सर करण्याची सवय अशा लोकांना जडते. आळसामुळे सोप्या गोष्टीही अवघड वाटू लागतात. अशाने त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीच साध्य होत नाही. अपयश झेलतच ही आळशी मंडळी जगत असतात. याउलट उद्योगी लोकांचे असते. त्यांच्या प्रयत्नाने अवघड गोष्टीही सहजशक्य होतात. विविध क्षेत्रांतील यशस्वी लोकांमध्ये अशा व्यक्तींचा समावेश असतो. भगवतगीता म्हणते, जो स्वत:च्या उद्धारासाठी, स्वत:च्या प्रगतीसाठी असतो त्यालाच ईश्वरही मदत करतो. झोपलेल्या सिंहाने नुसती शिकारीची कल्पना केली, तर पशू त्याच्या तोंडात आपोआप येऊन पडत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता आळसाच्या आहारी जाऊन केलेल्या मनोरथांनी कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. सतत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातच विजयाची माळ पडते. उद्योगाच्या घरी ‘रिद्धीसिद्धी पाणी भरी’ हे वचन काही व्यक्तींनी खºया अर्थाने सार्थ केले आहे. प्रपंच असो वा परमार्थ, राजकारण असो वा समाजकारण, प्रयत्नांची आवश्यकता सर्वच क्षेत्रांत आहे. टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, अंबानी या उद्योगपतींनी अविरत परिश्रम घेतले म्हणून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न झाली. कित्येक घरात वैभवलक्ष्मीचे व्रत केले जाते. या व्रताला आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची जोड असली तरच लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. जर प्रयत्नच नसतील तर देवही काही करू शकत नाहीत, हे सत्य आहे. ‘यत्न तो देव जाणावा’ ही शिकवण समाजाला देण्यासाठी समर्थांनी अथक परिश्रम घेतले. भिक्षेच्या माध्यमातून घराघरात जाऊन ‘आलस्य अवघाच दवडावा, येत्न उदंडचि करावा’ असा संदेश दिला.
- स.भ. मोहनबुवा रामदासी