सद्गुरु श्री वामनराव पै सेवानिवृत्त डेप्युटी सेक्रेटरी फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय मुंबई, हे एक थोर तत्त्वज्ञांनी संत, विचारवंत व अलौकिक युगपुरुषच आहेत. गेली ७ दशकांहून अधिककाळ अव्याहतपणे सातत्याने व निरपेक्षतेने समाजप्रबोधनाचे महान कार्य अखेरच्या श्वासापर्यंत केले. प्रपंच व परमार्थ यांची सुरेख सांगड घालत त्यांनी जीवनविद्येचे निर्मिती केली. "हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे पुढे जावे," हे त्यांचे संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या दिव्य सिद्धांतांभोवती फिरत आहे. "नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण घडवू तसे नशीब घडते," असा त्यांचा संकेत आहे. जीवनविद्येचे तत्त्वज्ञान हे धर्मातीत वैश्विक व शाश्वत असून गरिबांना वरदान, श्रीमंताना आधार व विश्वाला उपयुक्त आहे. त्यांनी प्रबोधन व कीर्तन केली पण एक पै सुद्धा बिदागी घेतली नाही. अनेक ग्रंथ समाजाच्या सुखासाठी निर्माण केले पण एक पै सुद्धा रॉयल्टी घेतली नाही. लाखो लोकांना शिष्यत्व दिले पण एक पै सुद्धा गुरुदक्षिणा घेतली नाही. "तुम्ही सुखी झालात की मला गुरुदक्षिणा मिळाली" असे ते समजत. युगाच्या धावत्या गतीस अोळखून व बदलत्या काळानुसार कर्मकांड, सोवळे-ओवळे, जात-पात या परंपरागत संकल्पनांना वगळून प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, हे शास्रशुद्ध पद्धतीने सोप्या भाषेत व दैनंदिन उदाहरणातून स्पष्ट करण्यात सद्गुरु श्री वामनराव पै यांचा हातखंडा आहे.
नशिबाच्या विश्वासावर राहून निष्क्रिय होण्यापेक्षा "आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत" असा स्पष्ट विचार मांडून क्रिया आणि प्रतिक्रियेतून जीवन कसे घडते त्याचे विवेचन ते करतात. पाप-पुण्य, देव-धर्म, संस्कृती-नियती याविषयी नवीन संकल्पना सोप्या परिभाषेत ते मांडतात. प्रपंच आणि परमार्थ यांची ओढून ताणून घातलेली सांगड ही जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली नसून, 'संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा,' असा संदेश ते देतात. मानवी दुःखाचे नेमके मूळ कारण शोधून त्या मुळावरच घाव घालून माणसांतील माणूस जागा करून त्याला दिव्यत्वाकडे नेण्याचे महान सामर्थ्य या तत्वज्ञानात आहे. जोपर्यत मानवी मनात परिवर्तन होत नाही तोपर्यंत मानवी जीवनात व परिस्थितीत बदल घडून आणणे अशक्य आहे. सद्गुरूंचे संदेश अत्यंत वास्तववादी, प्रयत्नवादी आणि विकासवादी असे असून मानवी मनात सहज परिवर्तन घडून आणतात, म्हणून या तत्त्वज्ञानाची गरज आजच्या जगाला आहे.
सदगुरू श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या जीवनविद्येमुळे व्यसनाधीन झालेले अनेक लोक आज व्यसनमुक्त झाले आहेत. विद्यार्थी उत्तम अभ्यास करून वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत. स्त्रियांना पायातली वहाण समजून मारहाण करणारे आज सन्मानाची वागणूक देत आहेत. अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त होऊन आज सुखी समाधानी व आनंदी जीवन जगत आहेत. सद्गुरूंनी अज्ञान व अंधश्रद्धेवर सतत प्रहार केल्यामुळे लोकांत अंधश्रद्धेचे प्रमाण कमी होऊन ज्ञानाची आवड निर्माण होत आहे. "Love work" या सिध्दांतामुळे कामाचा कंटाळा करणारी माणसे आज आवडीने व प्रामाणिकपणे काम करू लागली व कुटुंबाची समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करू लागले. अनिष्ट व भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा दुःख देतो व आपले आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्यामुळे अनेक लोक त्यापासून परावृत्त होऊन कष्ट करून जीवन सुखी करू लागले. इतरांची निंदा-नालस्ती करणारी माणसे दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करू लागली. त्याचप्रमाणे सद्गुरू अध्यात्म शास्त्राचे मार्गदर्शन करून साधकांच्या दर्जाप्रमाणे त्यांना निरनिराळ्या साधना शिकवितात व ज्या साधकांची प्रगती होते त्यांना दिव्यसाधना अशा उच्च दर्जाचा साधनाही शिकवतात. सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जाती-जातीतील वैमनस्य घटून जनमानसांमध्ये राष्ट्रप्रेम वाढीस लागून धर्माधर्मात सहिष्णुता व सामंजस्य निर्माण होत आहे. थोडक्यात जीवनविद्येच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तन घडून आणण्यात येत आहे. आपले जीवन खऱ्या अर्थाने सुखी करण्याचे सामर्थ्य असणारी जीवनविद्या आजच्या काळाची गरज ठरली आहे.
- संतोष तोत्रे