- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
परमेश्वर प्राप्तीसाठी मनुष्य ध्यान, धारणा, जपजाप्य, तीर्थयात्रा, अर्चना इ साधना करीत असतांना साधकाच्या अंगी दैवी गुणांची नितांत गरज आहे. दया, क्षमा, शांती ही मूल्ये नसतील तर परमेश्वर कसा प्राप्त होईल..? दया हे सर्व धर्मांचे मूळ आहे. माऊली म्हणतात -
दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥सुखी पुरूषोत्तम । वसे जैसा
आपण म्हणाल, दया म्हणजे तरी काय..? शास्त्रकार दयेची व्याख्या करतांना म्हणतात -परेवा बंधुवर्गे वा मित्रे द्वेष्टारिवा सदा ।आपन्ने रिक्षतवय्यंतु दयेषा परिकीर्तीता ॥
दया दाखवतांना आप पर भाव नसावा. कोणीही संकटात सापडला असतांना त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे यासच दया असे म्हणतात. आप पर भावरहित वर्तन हेच देवाला आवडते. तुकाराम महाराज म्हणतात -दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥
जी दया आप्तेष्टांवर तीच घरातील नोकर चाकरावर केल्यास आपले वर्तन आप पर भावरहित समजावे. ईश्वराला आप पर भाव आवडत नाही. नाथ महाराज म्हणतात -परमात्मा श्रीहरी । जो अंतर्यामि सर्व शरीरी ॥जो परांचा द्वेष करी । तेणे द्वेषिला परमात्मा ॥
जर परमेश्वर सर्व अंतर्यामि आहे तर इतरांच्या ठिकाणी द्वेष मत्सर वैरभाव ठेवल्यास त्याच्या ह्रदयात असणाऱ्या श्रीहरिचा द्वेष केल्याचे पातक लागेल. सर्वठिकाणी भग्वद्भाव ठेवणारा भक्तच देवाला आवडतो. माऊली म्हणतात -जो सर्व भूतांचे ठायी । द्वेषाते नेणेची काही ॥आपपरु नाही । चैतन्य जैसा ॥तैसा अवघाची भूतमात्री । एकपणे जया मैत्री ॥कृपेशी धात्री । आपण या जी ॥
सर्व प्राणीमात्रांच्याबद्दल ज्याच्या अंत:करणात करुणा आहे, अशाच भक्तावर मी कृपा करतो, असा या वचनाचा आशय आहे. या सर्व संत वचनावरून आपल्या सहज लक्षात येईल की, दया हा गुण जीवनात निर्माण झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होणे शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराज दयेची व्याख्या करतांना म्हणतातआता दया ते ऐसी । पूर्ण चंद्रिका जैसी ॥निवविता न कडसी । साने थोर ॥तैसे दु:खिताचे शिणणे । हिरता सकणवपणे ॥उत्तम अधम नेणे । विचंगू गा ॥
एकदा शांतीसागर एकनाथ महाराज काशीची तीर्थयात्रा आटोपून पैठण क्षेत्री येत होते. बरोबर बरीच भक्त मंडळी होती. दुपारची वेळ होती. ऊन कडक पडलेले होते. सर्व अंगाची लाही लाही होत होती. नाथ बाबा एका झाडाच्या सावलीत थांबले होते. इतक्यात एका गाढवाचं ओरडणं नाथांच्या कानावर आले. दयार्द्र नाथांना वाळूच्या ढिगाऱ्यावर एक गाढव तृषार्त होऊन लोळत पडलेले दिसले. त्यांनी काशीवरून आणलेली गंगा गाढवाच्या मुखात ओतली. बरोबर असणारी भक्त मंडळी म्हणाली, बाबा या गंगामातेचा तुम्ही रामेश्वराला अभिषेक करणार होतात ना..?
नाथबाबा म्हणाले, आता हाच माझा रामेश्वर..! अरे! गाढव म्हणून त्याला आपण मरु दिले तर, याला निर्माण करणारा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईल का..? शिवाय त्याचा आत्मा आणि माझा आत्मा यात फरक कोणता..? देहाचा पडदा दूर केला तर या जगात हरिवाचून दुसरे आहे तरी काय..? केवढी समत्व बुद्धी....! अशा दयार्द्र भक्तावरच परमेश्वर प्रसन्न होतो. आज प्रगतीच्या युगात माणूस अंतराळात गेला पण शेजारच्या घरात त्याला करु णेची गंगा निर्माण करता येत नाही. बहिणाबाई म्हणतात -अरे! माणसा माणसा कधी होशील माणूस....?सुधारलेल्या जगात बिघडलेला माणूस बघून मन विषण्ण होते म्हणून दया या जीवन मूल्याचे हे निरुपण केले..!
(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 9421344960 )