या जगामध्ये मन हेच कर्मरूपी वृक्षाचे अंकुर उत्पन्न करणारे आहे. सर्व काही मनावरच आहे. थोडक्यात मनच जगत् आहे किंवा जगत् हेच मन आहे. निर्मल आणि सत्त्वस्वरूप मन ज्या विषयाबद्दल जशी भावना ठेवते तसेच त्याचे मन होते. मनाच्या भेदानुसार जिवाचा भेद ठरत असतो. सर्वशक्तिमान असलेले मन यानुसारच सर्वशक्तिमान असलेले परमतत्त्व याचे संकल्पमय रूप ही मनाची शक्ती समजली जाते. काहीही कर्म मनानुसारच ठरते. कल्पनारूपी मन ही क्रिया आहे. विभिन्न शरीराचे कारण मन आहे. मनच जन्म घेते आणि मनच मरते. परंतु मनावर विजय मिळवला की मोक्षाची प्राप्ती निश्चित आहे. अज्ञानी पुरुषांचे मन संसाररूपी भ्रमाचे कारण आहे. कारण मनाच्या संकल्पानुसार सृष्टीचा विस्तार होतो. मनाचे जे मननात्मक रूप प्रकट होते तीच ब्रह्माची शक्ती मानली जाते. मनाचा नाश किंवा मनाचा विजय यावरून सुख-दु:खाची निर्मिती होते. ज्याचे मन कानासोबत असते त्यालाच ऐकू येते. ज्याचे मन डोळ्यासोबत असते त्यालाच दिसते. यावरून असे लक्षात येते की इंद्रियांच्या वृत्तींमध्ये मनच अनुवृत्त असते.
मन सत्य-असत्य याची स्थापना करते. शत्रूला मित्र अन् मित्राला शत्रू बनवायचे काम मनाचेच आहे. त्यामुळे मनाला जिंकल्याने सर्व इंद्रिय आपल्या ताब्यात येतात. मनाच्या स्थिती-गतीनुसार इंद्रियांच्या हालचाली होत असतात. मन उत्कृष्ट आहे. कारण मनापासूनच इंद्रिय उत्पन्न झाले. इंद्रियानुसार मन वागत नाही तर मनाप्रमाणे इंद्रिय वागतात. जागृती आणि स्वप्नाची भूमिका मनाचा विकास मानला जातो. ज्याचे मन विषयरूपी वासनेत अधिक न अडकता एका ठिकाणी स्थिर केल्यास तो या सर्व संसारावर विजय मिळवू शकतो. मी आणि माझे ही भावना संपली की मन स्थिर होते. ज्याचे मन स्थिर झाले असे महात्मे या संसारात धन्य आहेत. त्यांचे मन शांत झालेले असते. कारण चेतन तत्त्वात जी चंचल क्रिया शक्ती विद्यमान आहे ती मानसी शक्ती आहे. जे मन चंचलरहित आहे तेच मन शांती आणि मोक्षाचा अनुभव करू शकते.डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)