'मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणणे'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:23 PM2018-11-19T12:23:25+5:302018-11-19T12:27:23+5:30
कुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
कुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात. कान, डोळे यांच्यासोबतही मनच असते. मन सात्त्विक, राजसिक व नामसिक असते का? मनावरूनच मनुष्य सात्त्विक, राजसिक, नामसिक आहे याची ओळख होते. त्रिगुणात्मकरूपी मायेला जरी सोडवायचे असले तरी ‘मनाची’ महत्त्वाची भूमिका असते. मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणण्याप्रमाणे होय. परमात्मा दिसत नाही, बोलत नाही; पण कार्य करत राहतो. तसेच मन आहे. न दिसता, न बोलता ते काम करते. मनामुळेच सृष्टीचा विस्तार झाला. प्रवृत्ती-निवृत्ती या दोन्ही मनावरच अवलंबून असतात. सूर-असुर-मुर्ख-अधम या लोकांची ओळखही त्यांच्या मनावरूनच ठरते. देवता-भक्त-भगवान यांचाही विचार मनावरच आहे.
अहंमत्व-ममत्व याची जाणीवही मनच करते. दु:ख-शोक-आनंद-आत्महित-परहित या सगळ्यांची ओळख मनावरूनच होते. जो जो भक्त ज्या ज्या देवतेची उपासना करतो, त्याच्या मनाला भावणाऱ्या स्वरूपाचे तो वर्णन करतो. त्यालाच इष्टदेव समजून पूजा करतो. त्या त्या स्वरूपावर त्या भक्तांची श्रद्धा दृढ होते ती मनामुळेच! जिकडे पाहिले तिकडे मनाचे कार्य आहे. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला की त्याच्या आत-बाहेर पाणीच असते त्याप्रमाणे सर्वकाही मनाचा खेळ आहे. संपूर्ण विश्व मनाची क्रीडा आहे. त्याच्यानुसार अनुभवरूपी रसाचा त्यात भाव ओतलेला असतो. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात मनाचा खेळ लक्षात आला तर तो महान होय. विवेक-अविवेकाची ओळख मनच करत असते. या जगात जितके प्राणी आहेत त्या सर्वांचे कार्य ‘मन’च करत असते. आशा-निराशा-इच्छा-द्वेष-दंभ-अहंकार हे सगळे मनानुसार ठरते. या सृष्टीतत्त्वात जे जे काही घडते त्या सर्वांना कारणीभूत ‘मन’ आहे. ब्रह्मरसाचा अनुभव घ्यायचा असला तरी तो मनाच्या चांगुलपणावरच आहे. कर्माच्या सर्व प्रयोजनाला कारणीभूत ‘मन’ असते. म्हणून मनोरूपी बीज चांगले पेरा फळे आपोआप चांगले येतील.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)