आत्ता नको, नंतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:29 AM2020-09-21T06:29:40+5:302020-09-21T06:29:48+5:30
- धनंजय जोशी गौतम बुद्धाने ‘नोबल एटफोल्ड पाथ’ म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’ शिकवला. त्याचे भाग कोठे? ते असे : सम्यक ...
- धनंजय जोशी
गौतम बुद्धाने ‘नोबल एटफोल्ड पाथ’ म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’ शिकवला. त्याचे भाग कोठे? ते असे : सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. त्यामध्ये मला ‘सम्यक व्यायाम’ किंवा
‘राइट एफर्ट’ जरा विचार करण्यासारखा वाटतो.
झेन गुरु तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात तेव्हा त्यात एक विलक्षण साधेपणा असतो. झेन गुरुंना ‘रोशी’पण म्हणतात जपानमध्ये. सुझुकी रोशी या झेन गुरुंचे पुस्तक ‘झेन माइंड, बिगिनर्स माइंड’ पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे. त्यांना एकदा त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, ‘रोशी, राइट एफर्ट म्हणजे काय?’ रोशी म्हणाले, ‘राइट एफर्ट म्हणजे सकाळी ध्यानाच्या वेळी घड्याळाचा गजर झाला की एक सेकंदही न थांबता अंथरुणातून उठणे!’
किती सुंदर उत्तर आहे! आपण काय करतो? गजर झाला की पहिला विचार - अरेरे, जरा अजून थोडा वेळ तरी झोपू दे! आणि एक वाईट (!) गोष्ट म्हणजे आपल्या घड्याळावर असलेले ‘स्नूझ’ बटण! त्याचा अर्थच मुळी ‘आत्ता नको, थोड्या वेळानं करू!’
- पण होते काय? एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आपण हरवून बसतो. रोशी म्हणाले अजिबात थांबू नये!.. साधनेची वेळ ना? ‘राइट एफर्ट’चा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये कसा सामावून घ्यायचा त्याचे हे उत्तर.
‘नाईकी’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. जगभर माहिती आहे ! त्या कंपनीचे बोधवाक्य किंवा स्लोगन आहे ‘जस्ट डू इट’ - न थांबता, एकही क्षण न घालवता. झेन गुरुंचे उत्तर आणि ‘जस्ट डू इट’ - दोन्ही एकच की वेगळे?
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे : उद्या पहाटे गजर वाजल्यावर तुम्ही काय करणार?