- विजयराज बोधनकरकाही दिवसांपूर्वी मी एका गावातून दुसऱ्या गावात पायवाटेने चाललो होतो. कुठे उजाड तर कुठे तुरळक झाडे तर कुठे हिरवागार शेतमळा नजरेस पडत होता. काही अंतरावरून मला आश्चर्यकारक दृश्य दिसलं. रस्त्यालगतच्या शेतात दहा-बारा माणसं झाडांची आरती करताना दिसलीत. मला वाटलं झाडाखाली एखादा देव वगैरे बसविला असेल, तर झाडाखाली तसं काहीच नव्हतं. ही मंडळी चक्क झाडांचीच आरती करताना दिसली. मला राहवलं नाही. मी माझी वाट थोडी फिरविली आणि झाडाच्या दिशेने चालू लागलो. थोडा वेळ चाललेल्या आरतीत मीही सहभागी झालो. आरती संपल्यावर सर्वांनी झाडाच्या बुंद्यावर डोकं ठेवून शिरसाष्टांग नमन केलं. झाडांची पूजा? मी उत्सुकतेने एका वडीलधाºयाला विचारलं! तुम्ही झाडांची का पूजा करता? कुठला देव वगैरे किंवा कुणाची समाधी वगैरे आहे का इथे? ते वडीलधारे गृहस्थ हसले आणि म्हणाले, झाडांनाच आम्ही देव मानतो. हाच आमचा खरा देव आहे. पंचतत्त्व आणि वृक्षराज हेच खरे देवांचे अवतार आहेत. मला हे सारं नवीन होतं. सर्वांनी नारळाचं ओलं खोबरं आणि गूळ असा प्रसाद मी घेतला. त्यावर ते काका म्हणाले! हा प्रसाद काय देवांनी बनविला का? नारळातून खोबरं आलं नि उसातून गूळ आला म्हणजे झाडापासूनच ना! तुमच्या अंगावरचे कपडे कुठून आलेत कापसापासूनच ना! रोज अन्न खातो, अन्न काय मशीन तयार करतयं का? भाजी झाडाला लागते, धान्य-गवत झाडातूनच येतं. मसाला, तेल झाडापासून येतं. लाकूडफाटा आणि पाऊससुद्धा झाडापासूनच तयार होतो. मग देव काय देतो? जगायला देवांचे आशीर्वाद नको तर पोटाला अन्न, अंगाला वस्त्र आणि सावलीला घर हे देणारा हा निसर्ग आहे की नाही? तोच खरा देव आहे.
पंचतत्त्व आणि वृक्षराज हेच खरे देवांचे अवतार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:25 AM