​​​​​​​आनंदाचे डोही आनंद तरंग : अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीराकडे जाण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:13 PM2019-07-25T12:13:37+5:302019-07-25T12:15:53+5:30

विठ्ठलाकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा मायानदी मुळीच खोल नाही. ती कमरेइतकीच खोल आहे...

pandharpur vitthal means way to education of life | ​​​​​​​आनंदाचे डोही आनंद तरंग : अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीराकडे जाण्यासाठी

​​​​​​​आनंदाचे डोही आनंद तरंग : अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीराकडे जाण्यासाठी

googlenewsNext

- डॉ . रामचंद्र देखणे  (प्रवचन व कीर्तनकार ) 

सकल संतांनी विठ्ठलाच्या वर्णनासाठी आपली अभंगसंपदा समर्पित केली. त्यांचे तळवे विटेवर समचरणांनी शोभत आहेत. त्यांच्या जोडून असलेल्या पदकमलावर अनेक ऋषिमुनींचे मन रंगून गेले आहे. छातीवर वैजयंतीमाळा ऐटीत रुळत आहेत. चंदनाची उटी लावली आहे. ‘‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रवी शशी कळा लोपलिया।’’ पांडुरंग हा सुंदर, सुकुमार, मदनाचा पुतळा आहे. त्याच्या तेजापुढे चंद्रसूर्याच्या प्रभाही लोपून जातात. 
सर्वस्व देणाच्या मेघांप्रमाणे त्याची अंगकांती निळ्यासावळ्या रंगांने शोभून दिसत आहे. जणू काही चैतन्यरूप आनंदच विठ्ठलाच्या रूपात साकारले आहे. कपाळावर तिलक आहे, तर माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणांच्या रत्नजडित मुकुट घातला आहे. त्या मुकुटाच्या प्रकाशात तो कृपादृष्टीने भक्तांना न्याहाळतो आहे. ही स्वयंभू वालुकामय मूर्ती १०८ सें.मी. उंचीची आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला दोन हात असून ते कटीवर ठेवले आहेत. विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग, पाठीवर शिंके, गळ्यात कौस्तुभमणी आणि हृदयावर श्रीवत्सलांछन आहे. पोटावर त्रिवळी असून कमरेला कमरबंद आहे. मूर्तीच्या पायावर ध्वज, अंकुरादी चिन्हे आहेत. दर्शनी रूपाने ती योगमूर्ती, तत्त्वदर्शनाने ज्ञानमूर्ती तर भावदर्शनाने भवमूर्ती आहे. तो कटेवर हात ठेवून का बरे उभा आहे? त्याने कोणतेही आयुध हाती न घेता कटेवर हात ठेवले आहेत. 
म्हणजे तो उदास नाही, तर त्याद्वारा लक्षणेने तो आपल्या भक्तांना दाखवतो, की ‘‘मामेव ये प्रपद्यन्ते, मायामेतां तरन्ति ते’’ माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा मायानदी मुळीच खोल नाही. ती कमरेइतकीच खोल आहे. ती सहज तरून जाणे शक्य आहे. मायेलाच अविद्या असे म्हणतात आणि अविद्या हे अज्ञानाचे रूप आहे. अज्ञानाची नदी तरून माझ्या दर्शनाने ज्ञानतीरावर सहज जाता येते. ती नदी विठ्ठलनामानेच पार करायची आहे.‘‘नाव चंद्रभागे तीरी । उभी पुंडलीकाचे द्वारी ।। कर धरुनिया करी । उभाउभी पालवी ।’’ अज्ञानाचा भवसागर तरून ज्ञानतीरावर जायचे आहे.

Web Title: pandharpur vitthal means way to education of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.