पावलो पंढरी वैकुंठ भुवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:56 PM2019-07-14T14:56:07+5:302019-07-14T14:56:38+5:30
आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे.
आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे. वाखरीतील सोहळा झाला की ओढ लागते ती म्हणजे विठूरायाची. पंढरीत प्रवेश करण्याचे कारण त्यासाठीच तर एवढा आटापिटा केला. रोज २५ -३० किलोमीटर चालून २०-२२ दिवसांचा प्रवास आटोपून कधी एकदा पंढरीत प्रवेश करून पांडुरंगाला भेटतो व चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकरायाचे दर्शन घेतो. या दर्शनाने कृतार्थ होतो, कारण त्या पुंडलिकानेच तर पांडुरंगाला पंढरीत उभे केले आहे. हा सर्व सोहळा नयनरम्य असतो. कारण ‘ज्ञानोबा - तुकोबांना पंढरीत नेण्यासाठी स्वत: पांडुरंग,नामदेव महाराज व पंढरपुरातील सर्व देवता व पंढरीतील प्रमुख पदाधिकारी वाखरीत येतात व त्यांचा सन्मान करून सोहळ्यात आलेले लाखो वारकरी पंढरपुरात दखल होतात. काही दिंड्या नवमीला, दशमीला व काही दिंड्या एकादशीला पंढरीत दाखल होतात. पंढरीत पोहोचल्याचा आनंद जगदगुरू तुकाराम महाराज वर्णन करतात,
पावलो पंढरी वैकुं ठभुवन, धन्य आजी दिन सोनियाचा ॥धृ॥
पावलो पंढरी आनंदे गजरी, वाजतील दुजे शंख भेरी ॥१॥
पावलो पंढरी क्षेत्र आलिंगूनी संत या सज्जनी निववील ॥२॥
पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला तो सखा पांडुरंग ॥३॥
पावलो पंढरी आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे ॥४॥
देवशयनी एकादशीचा प्रमुख विधी म्हणजे ‘चंद्रभागे स्नान, विधी तो हरीकथा, किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. नंतर प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा । त्यांच्या पुण्या नाही गणना ।। प्रदक्षिणा केली तरच वारी सफल होते. कदाचित पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर ! झळझळीत सोनसळा कळस, दिसतो सोज्वळा ॥ बरवें बरवें पंढरपूर, विठोबारायाचें नगर ॥ माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचें ॥ कलशदर्शन झाले तरी विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखेच असते. इतका सोपा विधी, भजन कीर्तन प्रवचन ऐकणे हा सर्व कार्यक्रम एकादशी ते पोर्णिमेपर्यंत दररोज असतो. पंढरीतील सोहळा कसा असतो, याचे सुंदर वर्णन संत जनाबाई करतात,
‘संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव ऊभा, जैसी समचरणांची शोभा,रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरीदास नाचत,सखा विरळा ज्ञानेश्वर,नामयाचा जो जिव्हार,ऐशा संता शरण जावे,जनी म्हणे त्या ध्यावे’ श्री संत जनाबार्इंनी केलेले वर्णन सार्थ आहे. कीर्तन,प्रवचन ही प्रबोधनाची प्रभावी साधने आहेत. विचाराची देवाण, घेवाण होते व तत्वज्ञानाची जाण निर्माण होतेअसा सोहळा. यावेळी जवळजवळ १५ लाखापेक्षाही जास्त भाविक पंढरीत दखल होताहेत. एक प्रकारे वारकऱ्यांचा कुंभमेळाच आहे.
-अशोकानंद महाराज कर्डिले