प्रचंड वेगाने धावणारे हे जग गेले काही महिने "कोराेना" नामक विषाणूमुळे अचानक ब्रेक लागल्याप्रमाणे थांबले आहे. संपुर्ण मानवजातीला या न दिसणार्या विषाणूने हतबल करून सोडले अाहे. लाखो लोकांनी मृत्युला कवटाळले आहे तर लाखो त्याच्या उंबरठ्यावर आहेत. कोरोनाच्या या महासंकटाने एखाद्या महायुध्दा इतकेच उग्र रूप धारण केले आहे. कधी नव्हे तो जग व जगातील माणूस आज प्रचंड धास्तावलेला दिसतोय, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, राष्ट्र -प्रांताचा असो, गरीब-श्रीमंत असो, उच्च-निच असो. या विषाणू बरोबर लढताना बलाढ्य विकसित देश जेंव्हा हतबल होतात तेंव्हा भन्नाट प्रगती साधणार्या विज्ञानाच्या किंवा मानवाच्या मर्यादाच उघड्या पडतात.
लॉकडाऊन मुळे आज प्रत्येकजण घरात बसलेला आहे. कोरोनासारख्या महाभंयकर संकटाचा सामना करण्यासाठी घरात बसणे, हाच एकमेव मार्ग आहे किंबहुना याच गनिमीकाव्याने आपण कोरोनाला पराभूत करू शकतो. आपण काहीही न करता घरात बसण्याचा संयम हाच खरंतर विजयाचा मार्ग आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणारे, खडा पहारा देणारे पोलीस, जीवाची बाजी लावणारे डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय, वैद्यकीय सुविधा पुरविणारे कर्मचारी, साफसफाई कामगार, अत्यावश्यक सेवा पुरविणारे, प्रशासन, राज्य व केंद्र सरकार, आदरणीय मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची किती कृतज्ञता व्यक्त करावी तितकी कमीच आहे. अक्षरशः डोळ्यात तेल घालून ते या संकटाशी सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहेत व ते आपल्याला घर न सोडण्याचे आवाहन करत आहेत. अपवाद सोडले तर आपण सर्वजण प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालनही करीत अाहोत. त्यामुळेच या भयानक परिस्थतीतही आपल्या भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणार्या विकसनशील देशाला त्यावर मात करण्यात यश मिळत आहे.
पण....घरात असल्याने शरीर जरी निवांत असले तरी मन मात्र अशांत झाले आहे. टि.व्ही. वरच्या बातम्यांनी तर या महामारीच्या संकटाचे वाढणारे रूप पाहून मन दिवसेंदिवस अधिकाधिक काळजी व चिंता करू लागते. भवितव्याची चिंताही अनेकांना सतावत आहे. अनेकांना दूर कुठेतरी परराज्यात किंवा परराष्ट्रात अडकलेल्या नातलगाची काळजी लागली आहे. हातावर पोट असणार्यांना प्रत्येक दिवशी पोट भरण्याची चिंता. नोकरदारांना नोकरीची जाण्याची भीती नाहीतर पगार कमी होण्याची चिंता. छोट्या व्यवसायिकांना गावी गेलेले कामगार परत येतील की नाही याची भीती. व्यवसायिकांना आपल्या व्यवसायाची चिंता, उद्योजकांना मंदीच्या लाटेची भिती. विकासाकडे झेपावणारे जगच ठप्प झाल्याने बेरोजगारी बरोबरच अर्थिक महासंकट देशाबरोबरच सर्व जगापुढे आ वासून उभे आहे.
त्यात भरिसभर काही कुटूंबात तर आयुष्यात पहिल्यांदाच इतके दिवस घरी असल्याने एकमेकांचे दोष दिसू लागले आहेत, एकमेकांशी होणारी भांडणे, तिरस्कार, मुले व वृध्दांची चिडचिड, पिढ्यांमधील अंतर यामुळे होणारे वादविवाद, शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांवर आलेला प्रचंड मानसिक ताण, या एक ना अनेक कारणांमुळे कुटूंब व्यवस्था मोडकळीस येते की काय? अशी भिती अनेक कुटूंबात निर्माण झाली आहे.
एकूणच काय तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रिय व वैश्विक पातळीवर मुलांपासून तर थोरांपर्यंत सर्वांनाच ही काळजी, चिंता व भितीची भावना अस्वस्थ करीत आहे.
पण थोडासा विचार केला तर लक्षात येतं की, मानवजातीचा इतिहास पाहिला तर अशा आपत्तींना जग तोंड देतच आले आहे व प्रत्येक वेळी त्यातून काहीतरी शिकलेही आहे. कैक महिन्यांपुर्वी झालेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे महापुराच्या रूपाने माणसांना घराबाहेर जावे लागले व एकमेकांना जवळ आणले, आज मात्र त्याच्याच प्रतापाने घरात कोंडले पण एकमेकांपासून दूर राहावे लागते आहे.
प्रत्येक प्राण्याचे वेगवेगळे वैशिष्टे आहे, त्याप्रमाणे तो वागतो. माणसाला बुध्दीचे वरदान दिले व ते वापरण्याचे कर्म स्वातंत्र्यही दिले. या बुध्दीचा वापर करून हे जग अधिक सुंदर करावे हाच निसर्गाचा संकेत आहे. माणसाने याच बुध्दी वापर करून विज्ञानाच्या सहाय्याने भन्नाट प्रगती केली. पण या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा प्रचंड र्हास माणसाने केला.
त्यामुळे निसर्ग नियमानुसार मानवजातीला त्याचे परीणाम भोगावेच लागतात. म्हणून आज आलेल्या संकटाला आपणच कारणीभूत असून त्याला निर्भयपणे तोंड देण्याचा कसोशीने प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्यच आहे.
खरंतर माणूस हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. नैसर्गिक पध्दतीने जे निर्माण होते तो निसर्ग, या निसर्गाच्या अतंर्गत जी अलौकीक, सुरेख व दिव्य अशी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. निसर्ग डोळ्याला दिसतो पण पर्यावरण डोळ्याला दिसत नाही. सदगुरू वामनराव पै सांगतात, "पर्यावरण हाच नारायण." म्हणून पर्यावरणाची जोपासना करणे, हीच परमेश्वराची खरी उपासना आहे.
सर्व उपाधी माजी गुप्त। चैतन्य असे सर्वगत॥ --- संत ज्ञानेश्वर माऊली
उपाधी म्हणजेच शरीर. त्यात गुप्तपणे वास करणारे चैतन्य म्हणजेच परमेश्वर किंवा ईश्वरीशक्ती होय. हीच ईश्वरीशक्ती माणसाच्या मनात वास करते.
इंद्रियानाम् मनच्यास्मी॥
मनोजात जगत् सर्वंम्। मन एवं जगतपती॥ ... उपनिषद
जगतपती असणार्या मनाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात.मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण॥
'अशक्य असे काहीही नाही' इतकी प्रचंड शक्ती असणार्या मनाचे सामर्थ्य फार मोठे आहे. कारण "अनंत कोटी ब्रम्हांड नायक अशी ईश्वरी शक्ती" आपल्या अंतर्मनात वास करते.
म्हणूनच म्हणतात ना.. पिंडी ते ब्रम्हांडी व ब्रम्हांडी ते पिंडी.
बहिर्मन व अंतर्मन मनाचे हे दोन भाग आहेत. ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांच्या द्वारे जगाशी संबंध जोडते व जाणिवपुर्वक (लक्षपूर्वक, विचारपुर्वक) कार्य करते त्याला बहिर्मन असे म्हणतात. तर ईश्वरी शक्तीशी जोडलेल्या व नेणिवपुर्वक म्हणजेच automatically कार्य करणार्या मनाच्या भागाला अंतर्मन असे म्हणतात. जे विचार आपण मनात घोळवत ठेवतो तेच विचार बहिर्मनातून अंतर्मनात खोल घुसतात, तिथे मूळ धरतात व कालांतराने जीवनाच्या पडद्यावर साकार होतात. म्हणूनच "जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार" 'काळजी करणे' हा माणसाला जडलेला एक रोग आहे. काळजी करण्यासारखी परिस्थिती असली तर माणूस काळजी करतोच, पण काळजी करण्यासारखी परिस्थिती नसली तरी माणूस काल्पनिक भयगंडाच्या आहारी जाऊन काळजी करीत बसतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो त्याप्रमाणे काळजीरुपी भुंगा माणसाचे जीवन पोखरीत असतो.
काळजी करण्याने नसलेले रोग सुद्धा निर्माण होतात. बुडत्याचा पाय जसा खोलात जात असतो, त्याप्रमाणे काळजी करणार्यांची परिस्थिती अधिकच बिकट होत असते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत काळजीला सोडचिठ्ठी देणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच जे काळजी घेतात त्यांच्यावर काळजी करण्याची वेळ क्वचितच येते.
आज या परिस्थतीने सैरभैर झालेला मनाला आवरण कठीण जातयं. अशा भयावह परीस्थितीतून जर आपल्याला बाहेर पडायचे असेल तर उपाय एकच तो म्हणजे "मनस्थिती बदला परिस्थती बदलेल"
"जसे मन तसे तन, जन आणि जीवन."म्हणूनच काळजी, चिंता, अपयश, रोग, दुःखाच्या भितीने नकारात्मक झालेल्या मनाला इष्ट, चांगले, यशदायी, आनंददायी, कल्याणकारी व विधायक अशा सकारात्मक विचारांनी भरून व भारून टाकणे. या विचारांचे चिंतन सतत मनात घोळविले की, ते अंतर्मनात जातात आणि आकाराला येतात. किंबहुना त्यासाठी अंतर्मन आकाशपाताळ एक करते व आपल्याला देते, म्हणून काळजी, चिंता करण्यापेक्षा शुभचिंतन करू या.
खरंतर प्रत्येक गोष्टीला सकारात्मक अशी दुसरी बाजू असते. आज प्रत्येकजण धावतच असतो. आपली मुले, पत्नी, पती, आई-वडील, भावंडं, आजी-आजोबा यांच्याकडे पहायला, त्यांच्यांशी बोलायला, वेळच नसतो. पण आज आपल्याला वेळच वेळ आहे. बायको किती कष्ट करते ते आपल्याला कळू लागलयं. मुलांना आपला सहवास गोष्टीं मिळतोय, याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसांडून वाहतो आहे. भावंडांशी मारलेल्या गप्पा बालपणीचा सुंदर भुतकाळा बरोबरच वर्तमानतील स्वप्नांना जागृत करीत आहेत. आई-वडीलांशी मनसोक्त संवाद साधता येतोय, याचाही आनंद वेगळाच अाहे. आजी-आजोबांना दिलेला वेळ त्यांच्या एकटेपणाला पळवून लावतोयं. खरंतर ज्या कुटूंबासाठी आपण रात्रंदिन धावतो, त्या कुटूंबाकडे आपण कधीच पहात नव्हतो याची जाणिव आज होतं अाहे.
आज एकत्र येऊन गप्पा मारणं, जेवणं, टी. व्ही. बघणे, पत्ते, कॅरम, बुध्दीबळ खेळणे, यातून नाती आणखी जवळ येऊन घट्ट होत आहेत. एकमेकांवरील प्रेम प्रकर्षाने जाणवतयं. पैसा, संपत्तीपेक्षाही हे किती महत्त्वाचे आहे, हे कळायला लागलयं. ज्या घरात आपण राहतोयं त्याचा कोपरान् कोपरा आपण न्हाळतोय. ज्यांनी ते बांधलंय त्यांचे स्मरण होतयं. घरातली प्रत्येक वस्तू सुध्दा आपल्याला भूतकाळात घेऊन जातेय. आपले जीवन अनेकांच्या मुळे चाललयं हे सहज ध्यानात येऊ लागलंय.आपण वेळेअभावी अनेक गोष्टींना, छंदाना तिलांजली दिली होती, जसे की, गायन, वाचन, चिंतन, व्यायाम, प्राणायम, ध्यानधारणा, नामस्मरण, साधना. त्यांची जोपासना करण्यासाठी वेळ मिळाला आहे. सर्व प्रकारची प्रदुषणं बंद झाली त्यामुळे प्रदुषणमुक्त वसुंधरा आज आपण पाहतो आहे. याचा फार मोठा इष्ट परीणाम पर्यावरणावर निश्चतच होत आहे. मानवाच्या वर्चस्वामुळे स्वत:चे मुक्तपण विसरून गेलेल्या इतर प्राण्यांनाही आज सर्वत्र मनसोक्त फिरता येते. आज भयानक परिस्थतीतही काही गोष्टी चांगल्या घडत आहेत की कदाचित त्या कधीच होऊ शकल्या नसत्या.
धावणार्याला जशी काही वेळ विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या धावण्याला "कोरोना" विषाणूने काही काळासाठी सक्तीची विश्रांती दिलीय, ती नवचैतन्याने नवजीवन घडविण्यासाठी. लहान मुले जशी घरात राहून कसलीही चिंता, काळजी न करता आनंद उपभोगत आहेत तसं जमविण्याचा आपणही प्रयत्न करू या.
परंतु जेव्हा परिस्थिती बिकट, दुःखकारक व काळजी करण्यासारखी असते, तेव्हा सुखी व आनंदाचे विचार बहिर्मनात घोळवता येणे अशक्य होऊन बसते. अशा प्रसंगी आपणाला आपल्या बाबतीत देवाने जे करावे असे वाटते, तेच इतरांना प्राप्त व्हावे, अशी देवाची अगदी मनोभावे प्रार्थना करणे होय.
सदगुरू श्री वामनराव पै यांनी विश्वशांतीसाठी विश्वकल्याणकारी अलौकिक व दिव्य शोध म्हणजे विश्वप्रार्थना. शुभ चिंतनाचा हा रामबाण उपाय. सुंदर, शुभ, भव्य व दिव्य अशा सकारात्मक विचारांच्या या विश्वप्रार्थनेचे चिंतन जर आपण सतत केले तर आपले, कुटूंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे व विश्वाचे जीवन सुखी, अानंदी व समृद्ध झाल्याशिवाय रहाणार नाही.
जेंव्हा ही प्रार्थना अनेकजणांनी म्हटली तर त्यातून सामुहिक अंतर्मनाची प्रचंड शक्ती निर्माण होते. परिणामी त्याचे फळ गुणित व विस्तारीत होऊन त्वरीत प्राप्त होते. आपण कोणत्याही जाती, धर्माचे असलात तरी ही प्रार्थना म्हणू शकतो. नास्तिक असाल तरी निसर्ग किंवा अंतर्मनाकडे ही प्रार्थना मागू शकतो.
समस्या, संकट, अाजार, दु:ख यातून बाहेर पडून आपले मनोबल वाढविणारी ही विश्वप्रार्थना आपण सर्वजण सतत म्हणूया व विश्वाला सुखी करू या...
विश्वप्रार्थना...
हे ईश्वरा...सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
म्हणून आजच्या या बिकट परिस्थतीतून जर बाहेर पडायचे असेल तर प्रयत्नांना प्रार्थनेची जोड देणे गरजेचे आहे.
- संतोष तोत्रेजीवनविद्या मिशन, महाराष्ट्र