पावावया ब्रह्मपूर्ण । सांडुनि देई दोषगुण ।।१।।सर्वांभूती समदृष्टि । हेचि भक्ति गोड मोठी ।।२।।या वेगळें थोर नाहीं । बरवें शोधूनियां पाही ।।३।।येणे संसार सुखाचा । म्हणे नामा शिंपीयाचा ।।४।।- संत नामदेव महाराजसंत शिरोमणी नामदेव महाराजांनी संसार सुखाचा होण्यासाठी आणि परमात्म्याच्या कृपेसाठी दोन महत्त्वाचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग आहे, दोष गुण सोडून द्यायचा. मुळात परमेश्वराची करुणा भाकणाºया संतांनी आपल्या गुणदोषांची प्रांजळ कबुली दिली आहे. देवापासून त्यांनी दोष लपविलेले नाही. कारण तो सर्वज्ञ आहे, हे त्यांना माहिती होते. आपल्यातील दोष गुण टाकून सद्गुण अंगी बाणवणे हीच परमार्थाची खरी वाटचाल आहे. वास्तविक पाहता हे दोष आपल्याला कळायला हवेत. आपण ते आपल्यात शोधून त्याचा त्याग करायला हवा. ‘माझे मज कळे । येती अवगुण । काय करू मन अनावर ।। असा जगद्गुरू तुकोबारायांचा कबुली जबाब महत्त्वाचा आहे. परनिंदा, स्वार्थीपणा, लोभीपणा इत्यादी अनेक दोष गुण आपल्यात आहेत, ते आपण सांडायला म्हणजे टाकायला हवेत.
पुढे नामदेवराय सर्वांभूती समभाव ठेवणं हीच गोड भक्तीची खूण म्हणून सांगतात. सर्वत्र समान भाव ठेवून भक्ती केली की भक्ताचे ज्ञानचक्षू उघडतात. कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी हे रोजच्या जेवणातले पदार्थ. पण श्रीसंत सावता महाराजांची ज्ञानदृष्टी इतकी व्यापक की त्यांना सारेच हरिरुप वाटत असे. माझा मळा हा भावच संपुष्टात आला. सावतोबांचा मळाही विठ्ठलरुप झाला. ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत’ हा सर्वांभूती भगवद् भावनेचा वस्तूपाठच ज्ञानदेवांनी दिला. अशा सर्वांभूती भगवत् भावनेलाच नामदेवांनी गोड भक्ती म्हटले आहे; आणि याच्यापेक्षा मोठे काहीही नाही, शोधून पहा हेही आवर्जून सांगायला विसरत नाहीत, तसेच अभंगाच्या शेवटच्या चरणात दोषगुणांचा त्याग व सर्वांभूती भगवद् भावना याच दोन गोष्टी सुखाचा संसार होण्याचा व पर्यायाने परमार्थ यशस्वी होण्याला कारणीभूत ठरतात, अशी ग्वाही नामदेवराय देतात.
अभंगातील या दोन बाबींचा विचार वारीच्या संदर्भाने केल्यास आपला परमार्थ सुखकर होण्यास मदत होईल. वारीला निघताना प्रत्येक वारकरी जी जबाबदारी आहे ती पूर्ण करून तरी किंवा तिची व्यवस्था लावून निघतो. घरात खायला मीठसुद्धा नाही आणि निघाला वारीला अशी वारी दोषपूर्ण ठरते म्हणून तर प्रपंच करावा नेटका असे आपल्याला संतांनी आवर्जून सांगितले. वारीत चालताना प्रत्येक वारकरी हा केवळ पांडुरंगांसाठीच चालत असतो, एकमेकाला धक्का जरी लागला तरी माऊली म्हणायचे, काही विचारायचे नाही, काही घ्यायचे, काही द्यायचे तरीही माऊली संबोधन ही वारीतली एकवाक्यता सर्वांभूती भगवद्भाव शिकवणुकीची पहिली पायरी होय. हाच वारीतला भाव आपल्याला जीवनात दृढ करायचा म्हणजे नक्की आपला संसार सुखाचा होईल. सर्वांभूती भगवद्भाव अंत:करणात साठल्याचा तपकिरे बाबांना आलेला प्रत्यय पाहून श्री शितोळे सरकार बाबांच्या पायावर नतमस्तक झाले.
आपला दैनंदिन संसार सुखाचा व्हावा असे ज्या साधक भक्ताला वाटत असेल त्याने गुणदोषांचा त्याग व सर्वांभूती भगवद्भाव या बाबी मनापासून स्वीकारून त्याप्रमाणे आचरण करायला हवे. परंतु, या गोष्टी समजण्यासाठी, आकलनासाठी आणि आचरणात आणताना सोप्या होण्यासाठी नामस्मरण सांगितले. पारमार्थिक जीवनाचा अविभाज्य अंग असलेल्या नामस्मरणाचा महिमा संत चोखोबांच्या शब्दात आपण उद्याचा अंकात पाहणार आहोत, क्रमश :- ह. भ. प. डॉ. अनंत महाराज बिडवे