आंधळा खेळ हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:26 AM2019-03-11T05:26:50+5:302019-03-11T05:28:45+5:30
आज हजारो आंधळे नको त्यांचे पाय चेपत आहेत. त्यांचे डोळे उघडायला तयारच नाहीत.
-प्रा. शिवाजीराव भुकेले
आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला. काळ्याकुट्ट मेघांचे गर्जन तर्जन सुरू झाले. रिमझिम पावसाची बरसात झाली की, मयूराच्या आनंदाला उधाण येते व आपला भव्य पिसारा फुलवून तो नाचू लागला की, मोरपिसांचे सप्तरंग आणि प्रत्येक पिसामधील डोळाभाव वेड्या रसिकाला भाव समाधीचा आनंद देतात; पण हळूहळू लक्षात यायला लागते, मोराच्या पिसाऱ्यातील सहस्रावधी डोळे दिसायला कितीही सुंदर असले तरी असायला सुंदर नाहीत, ते तर आंधळे आहेत. अंधश्रद्धा नावाच्या आंधळ्या खेळाचे अगदी असेच आहे. त्यामध्ये सुंदरता, प्रदर्शन प्रधानता व राजसी वैभव आहे, पण साराच आंधळा खेळ आहे. आज हजारो आंधळे नको त्यांचे पाय चेपत आहेत. त्यांचे डोळे उघडायला तयारच नाहीत. ते उघडू नयेत यासाठी काही यंत्रणा पद्धतशीरपणे कार्यरत आहेत. ज्या अनेक साधू, बापू, योगी, योगिनी यांचे केवळ पाय धुऊन पित नाहीत तर त्यांचे पाय डोक्यावर घेऊन नाचत आहेत. ज्यांच्याविषयी मध्ययुगातले महात्मा फुले, तुकोबाराय स्पष्टपणे म्हणाले होते,
टिळा-टोपी घालून माळ म्हणती आम्ही साधू,
दया धर्म नाही चित्ती ते जाणावें भोंदू।
कलीयुगी घरोघरी संत झाले फार,
वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार।।
डोळस श्रद्धेचे भाव ज्यांच्या मनी-मानसी भरून उरले होते, त्या तुकोबांनी निक्षून सांगितले होते. गंडे, दोरे, तंत्र, मंत्र, ताईत घालून भवरोगाचे दु:ख नाहीसे होईल, असे मानणे शुुद्ध आंधळेपणा आहे. आज ताईत जाऊन लॉकेट आली, पण आंधळे ते आंधळेच राहिले.