बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:45 PM2018-11-12T20:45:16+5:302018-11-12T20:48:47+5:30
शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस.
- धर्मराज हल्लाळे
शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस. असा शब्दांना घट्ट धरून जगणारा माणूस समाजाच्या आदरस्थानी असतो. ह्यजान जायें पर वचन न जायेह्ण ही धारणा ज्याच्या ठायी असते, तो शब्दांवर पक्का असतो. तो शब्द फिरवत नाही. मग त्यासाठी आयुष्य पणाला लागले तरी चालेल. संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंगातून मानवी वृत्ती, प्रवृत्ती सांगितल्या आहेत.
शब्द प्रहाराने समाजमन जागे केले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसाच वागतो, त्याच्या पावलांचे वंदन केले पाहिजे. तसे वंदन करावीत अशी पाऊले अभावानेच दिसतात. खरे बोलणे, खरे वागणे हा अव्यवहारीपणा मानला जातो. याउलट जसे बोलू तसे वागू नये हाच जणू व्यवहार सांगितला जातो. मात्र अशा व्यवहाराने त्या व्यक्तीचे आयुष्य खोटेपणाच्या वर्तुळात फिरत राहते. आभासी जीवन वाट्याला येते. दुसऱ्याची फसवणूक करताना आपण स्वत:लाच फसवीत असतो. शब्द न पाळल्याने अप्रतिष्ठा वाट्याला येते. आपले सामाजिक मूल्य घसरते. हा माणूस शब्दाला जागत नाही. जे बोलतो त्याच्या उलट वागतो. कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी दूषणे आपले व्यक्तिमत्त्व डागाळतात.
जे बोलाल ते केलेच पाहिजे. उक्ती तशी कृती असलीच पाहिजे. ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही त्या न बोललेल्या ब-या. शब्द जपून वापरले पाहिजेत. कारण शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा अन् शब्दच विझवितात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची. अर्थात आपले बोलणे समाजाच्या भल्याचे असावे. ख-याच्या बाजूने असावे. शब्दात मोठी ताकद आहे. ज्या शब्दांनी घरे, दारे, देश पेटतात त्याच शब्दांनी माणसांना शांतही करता येते. ही शब्दमहती जशी आहे तसे शब्दांना जागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जे करू शकू ते बोला. जे बोलले ते करा. आपल्यावर विसंबून असणाºयांना धोका झाला तर त्यांच्यासाठी तो एक वाईट अनुभव असतो. ज्याची ते पुनरावृत्ती करीत नाहीत. अर्थात ते पुन्हा कधीच आपल्यावर विसंबून राहत नाहीत, म्हणजेच विश्वास ठेवत नाहीत. ज्यामुळे आपण जवळचा माणूस गमावतो.