विचारे दृढता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:01 AM2019-03-12T05:01:07+5:302019-03-12T05:02:57+5:30
विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही.
- बा.भो. शास्त्री
‘आचारे योग्यता’ यावर आपण चिंतन केलं आहे. आता सूत्राचा उत्तरार्ध ‘विचारे दृढता’ यावरचं चिंतन करूया. विचार ही एक शक्ती आहे आणि ती माणसाशिवाय कुठल्याच सजीव प्राण्यात नाही. हीच त्याची विशेषत: आहे. म्हणून तोच नराचा नारायण होतो. आचारासारखी विचारात शक्ती असते. एकीने योग्यता तयार होते व दुसरीने कोणता लाभ होतो हे आपण पाहणार. अप्राप्ताची प्राप्ती हा योग आहे व त्या योगची यथास्थिती ठेवण्यासाठी त्या शक्तीला दृढता किंवा दक्षता म्हणतात. या विकासात्मक शक्ती मानवाला उन्नत करतात. आचार सन्मार्गावर व विचार तोल सांभाळतो. कर्म गती देतं. आयुष्याच्या रस्त्यावर जी धोकादायक वळणं असतात, तेथे क्षणभर दक्षता ढळली तर अपघात होण्याची शक्यता असते. तरीच चालायला गती व न चुकायला मती लागते. थोडं जरी बेसावध असलं तर भल्याभल्यांचे अपघात होतात. म्हणून त्यात सातत्य हवं आहे. संत तुकोबा म्हणाले,
‘क्षणोक्षणी हाचि करावा
विचार तरावया पार भवसिंधू’
हा विचार शाश्वताचा-अशाश्वताचा आहे. संसार-परमार्थाचा आहे. धनाचा-मनाचा-तनाचा आहे. संकल्प विकल्पात्मक असलेल्या चंचल मनाला सतत हेलकावे बसतात. म्हणून दृढनिश्चयाचा विचार स्वामी सांगतात. नसुद्ध वीरत्व कामाचं नाही. त्याने विचलित होऊ नये म्हणून त्याला धैर्याची सोबत असावी लागते. महानुभाव कवी केशिराज म्हणतात-
मी प्रवर्तला परमार्गी
तव महाविघ्नी केली लागी
लेवूनी विचाराची वज्रांगी
प्रबोधु परसे पराभविली
ते म्हणतात, माझ्यावर अविचाराने संकट आणलं होतं. त्याचा मी विचार-शस्त्राने पराभव केला. कालिदासात तोडता येत होतं, पण कुठं उभं राहून तोडावं हे कळत नव्हतं. पुढे तोच विचारशक्तीने महाकवी झाला. विचाराचं शस्त्र अपात्रतेच्या हाती जायला नको. अश्वत्थामाला ब्रह्मास्त्राचं ज्ञान होतं, पण त्याचा कधी कशासाठी वापर करायचा याचा विवेक नव्हता. आज विचारवंतांना अशीच भीती अण्वस्त्रांबाबत सतावत आहे. कृतीचा परिणाम ज्याला कळतो, तोच विचारवंत असतो. यासाठी सामर्थ्य असायला पाहिजेच, पण त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं लागतं. संयमाचा ब्रेक हवा. लगामाशिवाय घोडा व विवेकाशिवाय माणूस हा वेडाच असतो. मोबाइलचं सामर्थ्य चांगलं, तो गरजेचा आहे. पण त्याचा वापर करायला विवेक लागतो. अन्यथा बरबादी पण होऊ शकते. तारुण्य, धन, प्रभुत्व व अविवेक या चार अपघाताच्या जागा असल्याचं शास्त्र सांगतं. यापैकी एकच रसातळाला नेऊ शकतं. जर चारही उपलब्ध असले तर रावणही मारला जातो. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या साहित्यात श्रोत्यांची मनधरणी करून विवेकाची पेरणी केली आहे. आधी त्यांचे कान तयार केले. नंतर शब्दब्रह्माचा रस त्यात ओतला. शके ११४१ मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं त्यांनी अंतर्बाह्य सूक्ष्म निरीक्षण केलं. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून’ प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला.