क्व सुधा क्व कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:28 AM2018-06-06T02:28:14+5:302018-06-06T02:28:14+5:30

कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले.  घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने.

Qha Sudha Kva Katha | क्व सुधा क्व कथा

क्व सुधा क्व कथा

Next

- डॉ. गोविंद काळे

कथेने, गोष्टीने भारतीय साहित्य संस्कृतीचे दालन समृद्ध केले आहे़ बालमनाला संस्कारी केले़ अनेकांना घडविले.  घराच्या अंगणात नाहीतर माळवदावर पहिला वहिला संस्कार केला तो गोष्टीने-कथेने. मग ती लाकूडतोड्याची गोष्ट असो वा आकाशातील चंद्राची मागणी करणाऱ्या रामाची असो अथवा खुलभर दुधाची कथा असो़ पंचतंत्राचा कर्ता विष्णुशर्मा हा बालमनाच्या लेखी फ ार मोठा लेखक होता़ पंचतंत्राबरोबर ‘हितोपदेश’ नाव घ्यावे लागते़ आकाशातील चंदामामापेक्षा दर महिन्याला हाती पडणाºया ‘चांदोबा’ मासिकाचे वेड बालमनाला अधिक होते़ त्यातील कथा आणि प्रसंगानुरूप चित्रे, नैतिकतेचे पाठ कळत-नकळत देऊन जात़ झाडावर लटकणाºया वेताळाची गोष्ट सुद्धा त्याला अपवाद नाही़
हायस्कूलमध्ये एखाद्या विषयाचा शिक्षक गैरहजर असेल तर येणारा बदली शिक्षक शिकविण्यापेक्षा कथा सांगण्याचे काम उत्तम करी़ गणित, विज्ञान, इंग्रजी तासापेक्षा गोष्टीचा तास विद्यार्थ्यांना अधिक आनंद देऊन जाई़ साने गुरुजी कथामाला या गुरुजींच्या स्मरणार्थ निघालेल्या संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना बोलते केले. तसे हजारो विद्यार्थ्यांना ऐकते केले म्हणजे श्रोते बनविले़ कथा ध्येयवाद शिकविते तसे मनातील चांगुलपणाला खतपाणी घालते़ कथामालेचे कार्य अन्य संस्थांसाठी अनुकरणीय ठरावे़ चित्रपटाचे पेव आले आणि कथा गोष्टींनी मान टाकली़ चित्रपटातील स्टोरी सांगण्याचा आग्रह घरोघरी सुरू झाला़ कथा नीतिमूल्यांची रुजवण करत होती. स्टोरीला ते जमले नाही़ कथा गेली - संस्कारही लोप पावला़
अष्टादश पुराणेषू ‘श्रीमद्भागवत’ पुराणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे़ आजही देशभरात ‘भागवत सप्ताह’ होताना दिसतात़ भागवत कथा म्हणजे अमृत कथा़ नव्हे अमृतापेक्षाही अधिक मौल्यवान मानली गेली आहे़ शुकमुनींची भागवत कथा ऐकण्यासाठी सर्व देव जमलेले आहेत़

शुकं नत्वावदन् सर्वे स्वकार्यकुशला: सुरा:।
कथासुधां प्रयच्छस्व गृहीत्वैव सुधाभिमाम्॥
आपले ईप्सित साध्य करून घेणाºया देवांनी शुकमुनींना प्रणाम करून आम्ही अमृत आणले आहे ते आपण स्वीकारावे व आम्हाला भागवत कथेचे दान करावे़ आपल्या पूर्वजांनी प्रत्यक्ष अमृतापेक्षाही कथामृताला अधिक महत्त्व दिले आहे़ अमृतसेवनाने अमर होऊन राक्षसी कृत्ये करण्यापेक्षा कथामृताने भक्ती-करुणा निर्माण होऊन मानवतेचा धागा अधिक बळकट होईल असा विचार पूर्वज करते झाले़ कथासुधेच्या सेवनाने माणसाचे वर्तन आणि त्याचे अस्तित्व सर्व प्राणीमात्रांसाठी सुसह्य ठरावे ही कल्पना त्यामागे आहे़ राजा परिक्षिताला कथा सांगण्यासाठी शुकदेव सभेमध्ये आले तेव्हा देव अमृत घेऊन आले़ देवांना ऐकावे लागले ‘क्व सुधा क्व कथा’ कुठे अमृत आणि कुठे कथा. अमृताहुनी गोड कथा तुझी देवा, असे गाणे नव्याने गावे लागेल़

Web Title: Qha Sudha Kva Katha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.