आनंद तरंग - एक प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 04:34 AM2019-09-07T04:34:55+5:302019-09-07T04:34:57+5:30
चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते.
नीता ब्रह्मकुमारी
चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते. फार वर्षांपूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश होते. वेदांचे गाढे अभ्यासी व कर्मसिद्धांतावर जबर विश्वास ठेवणारे. एका गावी नदीकाठी गेले असताना एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा हातात असलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबांनी बरोबर बघितला होता. काही महिन्यानंतर तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच न्यायाधीशांसमोर; परंतु आरोपीच्या पिंजºयात उभा असणारा संशयित कोणी दुसरीच व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात येते. पुढे पोलिसांनी आरोपीविरुद्ध इतका सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता, असे साक्षी पुराव्याने सिद्ध झाले व आरोपीला फाशीची शिक्षा दिली.
सत्य परिस्थिती जाणणाºया न्यायाधीशांनी आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खासगीत बोलण्यासाठी पाचारण केले. आरोपी रडू लागला व वारंवार म्हणू लागला की ‘मी निर्दोष आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध जबरदस्त पुरावे सादर करून कायद्याने मला खुनी ठरवले.’ न्यायाधीशांनी संमती दिली; परंतु कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो हे त्याला समजावले; परंतु परमेश्वरनिर्मित कर्म-कायद्यात कधीही गफलत होऊ शकत नाही हेही तितकेच खरे. त्यांनी त्या आरोपीला विचारले, ‘ईश्वराला स्मरून सांग, भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का ?’ आरोपीने रडत सांगितले की पूर्वी एक सोडून दोन खून केले होते; परंतु पैशांच्या जोरावर नामवंत हुशार वकील नेमल्याने दोन्ही वेळा सुटका झाली; पण या वेळी आर्थिक स्थिती खालावल्याने तो तसे करू शकला नाही व पूर्ण निर्दोष असूनही तोच खुनी म्हणून सिद्ध करण्यात आला. तात्पर्य हे की कर्म करण्यापूर्वी विचार तपासून घ्यावेत.