इस्लामी विचारधारेची निर्मिती कुराणातूऩ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:58 AM2019-05-29T11:58:40+5:302019-05-29T11:59:20+5:30
अध्यात्मिक.....
इस्लामी विचारधारेची निर्मिती कुराण आणि प्रेषितांच्या आचरण तत्त्वांच्या एकत्रीकरणातून झालेली आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मानवी जीवनाला मार्गदर्शक, प्रेरक ठरू शकतील, असे आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील अशा अनेक प्रसंगांना जगभरातील साहित्यामध्ये वेगवेगळ्या रूपात स्थान मिळाले आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील अनेक घटना, अनेक प्रसंग वेगवेगळ्या भाषांमधल्या साहित्यिकांनी वेगवेगळी पात्रे वापरून सादर केले आहेत.
प्रेषित त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंगी उदार मनाने, मानवतेने वागले आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील हे प्रसंग इस्लामच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यातील एका वृद्ध स्त्रीविषयी प्रेषितांनी दाखवलेली परहित सहिष्णू वृत्ती इस्लामी इतिहासामध्ये बोधप्रद मानली जाते. ही घटना प्रेषितांनी मक्केवर विजय संपादित केल्यानंतरची आहे. प्रेषितांकडे इस्लामी राज्याची धुरा होती. त्यावेळी प्रेषित (स.) त्यांना त्रास देणाºया कोणत्याही व्यक्तीस शिक्षा देऊ शकत होते. त्यामुळे त्या वृद्ध स्त्रीविषयीच्या प्रसंगात प्रेषितांनी दाखवलेल्या उदारतेस अत्यंत महत्त्व आहे.
प्रेषित मोहम्मद (स.) नमाजाला जाण्यासाठी निघाले की, एक वृद्ध स्त्री त्यांच्या अंगावर कचरा टाकत असे. त्यामुळे प्रेषितांचे कपडे खराब होत होते. पण प्रेषितांनी कधीही त्या वृद्ध स्त्रीला याविषयी जाब विचारला नाही. कित्येक दिवस प्रेषित (स.) नमाजाला जात असताना ती स्त्री त्यांच्या अंगावर घाण टाकत असे. एकेदिवशी त्या स्त्रीने प्रेषितांच्या अंगावर नमाजाला जाताना घाण टाकली नाही. तेव्हा प्रेषितांनी घरी जाऊन त्या वृद्ध स्त्रीची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की, ती वृद्ध स्त्री आजारी आहे. त्यानंतर प्रेषितांनी खूप काळजीपूर्वक त्या वृद्धेची विचारपूस केली, नंतर त्या स्त्रीचे निधन झाल्यानंतर प्रेषितांनी तिच्या अंत्ययात्रेस खांदाही दिला.
इस्लामी बोधकथांमध्ये प्रेषित इब्राहिम (अ.) यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा समावेश होतो. प्रेषित इब्राहिम (अ.) यांना मक्के तील लोकांनी मूर्ती फोडल्याचा आरोप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला प्रेषित इब्राहिम (अ.) यांना आगीत टाकण्यात आले. मक्का शहरातील लोक बघ्याच्या भूमिकेत होते. तितक्यात एक चिमणी तेथे आली. तिने शेजारी असलेल्या जलसाठ्यातून पाणी आणून आपल्या चोचीतून आगीवर टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा सैतानाने तिची टिंगल केली. तो म्हणाला, ‘इतक्या पाण्याने ही आग थोडीशी विझणार आहे’. तेव्हा ती चिमणी म्हणाली, ‘आग विझेल की नाही, याची मला कल्पना नाही. पण उद्या ज्या वेळेस आग लावणाºयांचा हिशेब घेतला जाईल, त्यावेळी माझे नाव आग विझवणारा यांच्या यादीत असेल.’
- आसिफ इक्बाल