।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:59 PM2019-06-22T12:59:06+5:302019-06-22T12:59:30+5:30

जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. आणि त्यांना ‘फादर आॅफ ड्रामा’ असेही म्हटले जाते.

..read Dnyaneshwari .. | ।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।

।। वाचावी ज्ञानेश्वरी ।।

googlenewsNext

अहमदनगर : जगातील सर्वश्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते. आणि त्यांना ‘फादर आॅफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किना-यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला.
समजा तुम्ही जर पर्यटनासाठी इंगलंडमध्ये गेलात आणि तेथील जाणकार माणसाची भेट झाली आणि तुम्ही जर त्याला सांगितले कि इंग्लडमध्ये बराच फिरलो आणि अमुक बघितले तमुक बघितले. त्यानंतर तो समोरचा माणूस तुम्हाला विचारतो कि तुम्ही सगळा इंग्लंड फिरून बघितला पण काहो ! तुम्ही आमच्या देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किना-यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन या गावात गेला होता का ? ते आमच्या शेक्सपियरचे जन्मस्थान आहे. आपण जर ते बघितले नाही म्हणून सांगितले तर तो माणूस म्हणतो मग तुम्ही काहीच बघितले नाही. असो हे सांगण्याचे तात्पर्य त्या लोकांना त्याच्या एका नाटककाराचे किती अप्रूप वाटते. मित्रानो ! जगामध्ये कुठेही तुम्ही जा. तुम्हाला मंदिरासाठी खांब दिसतील पण अहमदनगर जिल्यातील नेवासा हे असे एकमेव गाव आहे. येथे फक्त खांबासाठी मंदिर आहे.  जगात  अनेक भाषेत जिची भाषांतरे झाली आहेत अशी ज्ञानेश्वरी या खांबाला टेकून माउली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली. आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लाऊन घेतली . शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ।।ज्ञानेश्वरी. १८ वा अध्याय. ओवी क्र. १८१०. माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद गीतेवर मराठीत भाष्य केले, देशीकार लेणे केले. ‘माझा म-हाटीचा बोलू कौतुके । परी अमृताते पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। (ज्ञाने - ६.१४)  माउलींनी ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. ग्रंथ लेखन गोदावरी तटी नेवासे क्षेत्री झाले. आपणही हा विचार केला पाहिजे कि ‘जर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि नेवाशाला जाऊन माउलीचे मंदिर बघतिलेले नाही तर तुम्ही काही बघतिलेले नाही.’
            ग्रंथ निर्मितीची माहिती, लेखक, ठिकाण, साल, तत्कालीन राजा यांची नोंद ग्रंथाच्या शेवटी माउलींनी केली आहे. पण यात तिथीचा उल्लेख नाही. आणि असा अलौकिक ग्रंथ जिथे तयार झाला त्या ठिकाणाविषयी आपल्याल स्वाभिमान नसावा का ? इंग्लडच्या लोकांना त्यांच्या एका साहित्यिकाचा जाज्वल्य स्वाभिमान आहे किंबहुना जर त्या शेक्सपिअरच्या गावाला भेट दिली नसेल तर काही अर्थ नाही असे त्यांना वाटते. आम्हाला जिथे ज्ञानेश्वरी तयार झाली त्या नेवाशाविषयी माहितीही नसावी ? खरे तर येथे संतपीठ होणे आवश्यक आहे. बहुजन समाजाला संस्कृत समजत नव्हती आणि तळागाळातील लोकांपर्यंत हे गीतेचे ज्ञान गेले पाहिजे. त्याकरिता माउलीला करुणा निर्माण झाली आणि त्या करुणेपोटी ज्ञानेश्वरी निर्माण झाली आणि म-हाठी भाषेत लिहली गेली, ‘तो शांतूची अभिनवेल । ते परियसा म-हाठी बोल । जे समुद्राहूनी खोल अर्थभरित ।। ‘किंवा तेथ साहित्य आणि शांती । हि रेखा दिसे बोलती । जैसी लावण्या गुण कुलवंती । आणि पतिव्रता ।। महार्ठीचे हरवलेले वैभव ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा मिळवून दिले . वेदांताची प्रस्थान त्रयी म्हणजे गीता, दशोपनिषदें, ब्रहमसूत्र त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची सुध्हा प्रस्थान त्रयी आहे ती म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा. ज्ञानेश्वरीचे लाखो पारायणे झाली पण त्यातील गोडी यत्किंचितही कमी झाली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारे साहित्य विश्वातील हि एक क्रांतीच केली म्हणावे लागेल. वेदातील तत्वज्ञान गीतेमध्ये आले आणि गीतेतील तत्वज्ञान मराठीत ज्ञानेश्वरीत आले हि मोठी क्रांती झाली. किंबहुना माउलींनी वेदातील उणेपणा सुद्धा काढला, वेदु कृपण जाहला । जे कानी त्रिवगार्चे लागला । स्त्री शूद्रासी अबोला ।अद्यापि ठेला ।। वेदातील हे उणेपण ज्ञानेश्वरीच्या रूपाने भरून निघाले.  पसायदानासारखा मराठीतील शांतिपाठ माउलींनी एकूणच सर्व विश्वाला अर्पण केला. ओवी ज्ञानेशाची।  सुश्लोक वामनाचा ! आर्या मयुरपंतांची ! अभंग वाणी तुकयाचा ! असाही गौरव या मराठी कवींचा केलेला आहे. ज्ञानेश्वरीचे महत्व विशद करतांना संत जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पाहावी पंढरी ।।१।। ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ।।२।। ज्ञान हो मूढा । मूर्ख अति त्या दगडा ।।३।।वाचली जो कोणी । जणी त्यासी लोटांगणी ।। ती ज्ञानेश्वरी कशी वाचावी हे संत एकनाथ महाराज सांगतात, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।१।।स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णू । श्रीगीता हा प्रश्न अजुर्नेशी ।।२।। तात्पर्य भावनेने, श्रद्धेने हे ज्ञानेश्वरी जर आपण अभ्यासली तर ब्रहमज्ञान सहज होऊ शकते.
विशेष म्हणजे अज्ञानी जरी असला आणि त्याने ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी त्याला ज्ञान होईल व एखादा मूढ म्हणजे अगदी जड बुद्धीचा किंवा मूर्ख म्हणजे ज्याला काहीही कळत नाही असा जरी असला तरी त्याला सुद्धा ज्ञान सहज होईल असा या टीकेला(भाष्याला) वर आहे. श्री निवृत्तीनाथांनी वर म्हणजे आशीर्वाद दिला आहे ते म्हणाले , येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाहला ॥ हि या ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे.
खरे पहिले तर ज्ञानेश्वरीचे नाव ज्ञानेश्वरी नाही. माउलींनी स्वत: हे नाव ठेवलेले नाही. तिला अनेक नावे संतांनी ठेवेले आहेत. संत जनाबाई यांनी हे नाव दिले आहे , नामदेव महाराजांनी या ज्ञानेश्वरीचे फार छान वर्णन केले आहे,
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥ -
श्री नामदेव महाराज तिला निगमवल्ली ब्रह्मानंदलहरी, ज्ञानदेवी असेही म्हणतात पण! ज्ञानेश्वरी हे नाव प्रचलित झाले आणि सर्व वारकरी एवं मराठी वाचक तिला ज्ञानेश्वरी म्हणू लागला. असा आहा अपूर्व ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचा मुकुट आहे यात शंका नाही.
            एकनाथ महाराजांनी हा ग्रंथ शुध्द् केला अर्थात आजच्या भाषेत ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथशुद्धीची तिथी व साल दोन्हीची नोंद नाथ महाराजांनी केली आहे. ही तिथी आहे भाद्रपद वद्य षष्ठी.  ग्रंथ निर्मितीची तिथी उपलब्ध नसल्याने याच तिथीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते.  बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाहली ।। संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या(संपादन)  तिथीचा निर्देश. म्हणून याच दिवशी ज्ञानेश्वरीची जयंती मानण्याची वारक-यांची परंपरा आहे.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३


 

Web Title: ..read Dnyaneshwari ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.