ध्यासातून सद्गुरू; ध्यानातून होते गुरुतत्वाची प्राप्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:15 PM2019-07-16T13:15:23+5:302019-07-16T13:15:59+5:30
सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे.
अण्णासाहेब मोरे
भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज गुरु पौर्णिमेचा मंगल पावन दिन आहे. गुरु पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमादेखील म्हटले जाते. सर्व वेद, उपनिषदे, पुराणांचे रचनाकार व महाभारतसारख्या अजरामर राष्ट्रीय ग्रंथाचे सर्जक महर्षी व्यास यांचा हा स्मृतिदिन आहे. महर्षी व्यास हे ज्ञानगंगेचे उगमस्थान मानले जातात. श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू मनुष्य व मनुष्यता आहे. दिव्य प्रतिभा शिल्पी असलेल्या व्यास महर्षी स्मरणाचा आणि पूजनाचा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येतो. आध्यात्मिक भारतात गुरू-शिष्य नात्याला फार मोठे महानतेचे परिणाम व उंची लाभली आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व पसारा हा गुरु-शिष्य संवादातून साकार झाला आहे. या संवादाचे सर्वोत्तम स्वरूप श्रीमद्भगवत गीता आहे. श्रीकृष्ण-अर्जुन या गुरु-शिष्याच्या नात्यातून अमूर्त ज्ञान शब्दप्रवाही बनते व निर्गुण ईश्वर सगुण साकारतो.
गुरु-शिष्याचा चिन्मय आदर्श भगवान शिव व जगदंब पार्वती आहे. भगवान दत्तात्रेय व त्यांचे अवतार चराचराचे संपूर्ण ब्रह्मांडाचे श्रीगुरू आहेत. ते सद्गुरू व गुरुतत्त्व आहेत. अज्ञानाचे निरसन होऊन मानवाला ज्ञान प्राप्तीची ओढ लागावी, ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, त्या ज्ञानाने मीपणा व विकार नष्ट होऊन ज्ञानप्राप्तीसाठी प्राप्तीची जीवनात गुरूची आवश्यकता असते. गुरूमुळेच जीवनात मीपणा नष्ट होऊन विकार नाहीसे होतात. अंतर्बाह्य तेजोमयता धारण करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर सद्गुरू बनतो.
सद्गुरूच्या वात्सल्यपूर्ण शोधाने, कृपेने आणि मार्गदर्शनाने नराचा नारायण होतो. सर्व संतांनी आपल्या वाङमयात मनोभावे सद्गुरू महीमा वर्णन केला आहे. सद्गुरू हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा दाता आहे. भरभरून देणारा सद्गुरू हा परमउदार व निष्कांचन व निरपेक्ष आहे. सद्गुरूला शरण जाताच जन्मभराचे पाश तुटतात, अशी ग्वाही सर्व संतांनी दिली आहे.
बृहदारण्यकोपनिषदात ब्रह्मविद्येची आचार्य परंपरा विषद करताना तिचा प्रारंभ स्वयंभू परब्रह्मापासून सांगितला आहे. परमार्थ विद्या देणारे गुरू शिष्याला ज्ञानाच्या नित्य पौर्णिमेचे कैवल्य चांदणे अनुभवण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देतात. मुंडकोषनिषदात म्हणले की, ईश्वराच्या ठिकाणी जेवढी श्रद्धा भक्ती असते, तेवढीच सद्गुरूच्या ठिकाणी असेल तर परमेश्वराचे नित्य दर्शन घडते.
गुरूचा ध्यास शिष्याच्या मनी जडावा म्हणजे सद्गुरू शिष्याला सर्व सामर्थ्यांनी युक्त असे तेजस्वी, ज्ञानी बनवतात. या अर्थाने आपले शिष्यत्व विवेकाच्या आत्मप्रकाशात पारखून घेण्याचा सुदीन म्हणजे गुरूपौर्णिमा होय. ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी’ अशा चुकलेल्या माणसांना सुधारण्याचे कार्य सद्गुरू करतात.
प.पू. मोरे दादा या अर्थाने नेहमी म्हणत की, ‘गुरू से बडा गुरू का ध्यास’ ध्यासातून सद्गुरू व ध्यानातून गुरुतत्त्व मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूतत्त्वाचे पूर्ण तेजोमान निखळ विशुद्ध ज्ञान स्वरूप होय. तेच ब्रह्मानंदाचे उगमस्थान व सर्व सुखशांचीचे आश्रयस्थान आहेत. गुरुपौर्णिमेला श्री समर्थ महाराजांना आपले गुरूपद घेण्याची सविनय व मनोभावे प्रार्थना करावी.
(लेखक स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राचे (दिंडोरीप्रणित) प्रमुख आहेत.)