मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:40 AM2019-07-11T10:40:07+5:302019-07-11T10:40:39+5:30
मनाची निवृत्ती
मन हे एक असे महत्त्वाचे आहे की, प्रगती व अधोगती ही दोन्हीही त्याच्यावर अवलंबून आहे़ मनाच्या ठिकाणी निर्माण होणाºया विकारांमुळे जीवन अधोगतीला जाते आहे़ या अधोगतीतून बाहेर निघायचे असेल तर मनाला संतसंगाची गोडी लागायला पाहिजे़ याकरिता मनाने त्याची संसारिक प्रवृत्तीची आसक्ती कमी करून निवृत्तीचा स्वीकार करावा लागेल. मनाची निवृत्ती ही विवेक, वैराग्य इत्यादींनीयुक्त आहे़ विवेक आला की माणसाच्या जीवनातील अनेक प्रश्न संपून जातात़ संसाररूपी रोगावर ‘विचार’ हेच महाऔषध आहे़ शास्त्रकारांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत़
* काही गोष्टींचा कधीच विचार
करू नका
* काही गोष्टींचा थोडा विचार करा
* काही गोष्टींचा नेहमी विचार करा
संसारिक गोष्टीचा कधीच विचार करू नका की ज्या निष्फळ आहेत़ संगती, प्रगती, संपत्ती, संततीचा थोडा विचार करा व ‘मी कोण आहे?’ अशा तत्त्वाचा नेहमी विचार करावा़
मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
अशा तत्त्वविचाराने माणूस या दु:खरूपी संसारातून बाहेर पडेल, अन्यथा अखंड दु:ख भोगावे लागेल़ माणसाला जीवनातील सार काय व असार काय हे समजले पाहिजे़ संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात...
त्रिगुण असार निर्गुण हे सा।
सारासार विचार हरिपाठ।।
अशा या सारासार विचाराने निर्माण झालेले वैराग्य हे खरे वैराग्य होय़ वैराग्याच्या गोष्टी बोलणे सोपे असते, पण अंगी आणणे कठीण असते़ विवेक, वैराग्य, इंद्रीयनिग्रह या सर्वांचा परिणाम म्हणजे वृत्ती, ही निवृत्ती होणे म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी असलेली चंचलता निघून जाणे, वृत्तीची स्थिरता ही एकप्रकारची निवृत्तीच आहे़ ही निवृत्तीच या जीवाला निजबोधापर्यंत पोहोच करते़ मनाच्याच ठिकाणी प्रवृत्तीपासून निर्माण झालेला मोह आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निवृत्तीपासून निर्माण झालेला निजबोध आहे़
मोह हा या जीवाला सतत भुलविण्याचे काम करतो़ संत तुकाराम महाराज म्हणतात ना...
विषय ओढी भुलले जीव!
ही मोहाने निर्माण केलेली जीवाची विचिन्ह अवस्था आहे, तर याच मनाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या निजबोध हा या जीवाला ‘उन्मनी’ या अवस्थेपर्यंत घेऊन जातो़ तो कसा? याचा विचार पुढे करू!
- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले
धामणगावकर (पंढरपूर)