समाज हा मानवी जीवनाचा सामूहिकपणे जीवन जगण्याचे माध्यम आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात जगणे सुरक्षित समजतो. एकटा मनुष्य जीवन जगू शकत नाही त्याला इतरांची गरज असते. म्हणूनच कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था अस्तित्वात आहे. समाजात जगतांना समाजाचे काही संकेत असतात ते पाळणे गरजेचे असते. समाजाच्या चाली रिती प्रथा भिन्न भिन्न असतात.मात्र काळानुसार त्यात बदल करून समाज जीवन सुकर करण्याचा प्रयत्न सतत होत असतो. समाजाने टाकाऊ रूढी परंपरा नाकारल्याच पाहिजेत. तरच समाज प्रगती करू शकतो. समाजात वावरताना प्रत्येक जण आपली प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करीत असतो, समाजात आपला मानसन्मान व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण समाजात वावरतांना माणसाचे जे परस्परांशी संबंध येतात त्यात कुठल्या ना कुठल्या कारणांनी म्हणा, किंवा माणसाचा स्वभाव, प्रवृत्ती, मानसिकता या कारणांनी बेबनाव होतातच. ते साहजिकच आहे. पण बेबनाव झाला, पटत नाही म्हणून परस्परांचा द्वेष न ठेवता संबंध न ठेवणे व आपण चांगले शांतपणे जगणं यातच शहाणपण आहे. पण आजकाल हा शहाणपणा कमी होत चालला असून माणूस द्वेष, मत्सर, राग, लोभ, तिरस्कार मनात ठेवून जगतात. त्यातूनच काही लोकांच्या मनात बदला घेण्याची वृत्ती वाढते. या वृत्तीतून माणूस सतत त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलतात, त्याच्या कुचाळ्या, कांड्या करतात. त्या संबंधित व्यक्तीला त्रास देतात. ही प्रवृत्ती म्हणजे कमकुवत, अतृप्त मनाचे अघोरी कृत्य होय. अशी माणसं स्वत: कधीच समाधानी नसतात.असं म्हणतात की, वैराने कधी वैर संपत नाही, वैराला प्रेमानेच जिंकावे लागते. तथागताने समस्त मानव जातीला हाच संदेश दिला. पण हा संदेश माणूस कधी समजूनच घेत नाही म्हणून तो सतत दु:खात असतो. माणूस सतत भ्रमात जगतो. सत्ता, संपत्ती, पद व प्रतिष्ठा, श्रीमंतीच्या पाठीमागे धावत राहतो, अतिलोभामुळे तो भ्रष्ट बनतो, अनैतिक मागार्चा अवलंब करतो. तो जीवनात फक्त धावत राहतो जगत नाही. त्याच्या मनाला शांती, समाधान नाही तो सतत अस्वस्थ राहतो. यातून त्याच्या मनात इतरांचा द्वेष वाढतो. द्वेषातून बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते. बदला घेण्याच्या भावनेतून हाणामाऱ्या, भांडणे, खून, हत्या घडतात. इतरांच्या जीवनात दु:ख निर्माण करणारी माणसे स्वत: कधी सुखी जगूच शकत नाहीत हे सत्य कधी समजून घेत नाही. म्हणून जग अस्वस्थ आहे. युद्धाच्या मार्गावर आहे. त्याला यातून मार्ग काढण्यासाठी बुद्धाकडे जाणे आहे. कारण बुद्ध धम्म हा सदाचारी जीवनाचा मार्ग आहे. सुख, शांती, समाधान येथेच आहे. प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, ममता, समता, स्वातंत्र्य,बंधुता, न्याय व मानवता त्यातच आहे. तोच खरा माणुसकीचा जीवन मार्ग आहे. भवतु सब्ब मंगलम ...- प्रा.डॉ.एम.आर. इंगळे, अकोला