सोलापूर : ‘संतांची संगती ही जीवनात आवश्यक गोष्ट आहे. संत सहवासाने शारीरिक, मानसिक, बौद्धिक रोग दूर होतात. चिंता नाहीशा होतात. संत वाणीरूपी अमृतातून आपणास ईश्वराचा संदेश देतात. आपण परमेश्वराला पाहू शकत नसलो तरी संत महात्मा हे साक्षात परमेश्वराचे दूत असतात.
सत्संगाचा महिमा अपार आहे. सत्संगाचे महात्म्य शब्दातीत आहे. सत्संग फार दुर्मिळ आहे. जर तुम्हाला सत्संगाची तळमळ असेल तर धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहा. स्वत:ला धर्माशी जोडा, साधूसंतांची प्रवचने ऐका. त्यामुळे आपले जीवन परमोच्च शिखरावर पोहोचेल. सत्संगाचा मनमुराद आनंद लुटा. ‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो’ अशी प्रार्थना करा.
संतांच्या दर्शनाला वा प्रवचनाला जाताना नम्रतेने जा. पूर्ण रिकामे होऊन जा आणि येताना त्यांचे विचार, त्यांचा संदेश भरभरून घेऊन या. संतांच्या दरबारी गेल्यामुळे आत्मशुद्धी होईल. काहीतरी चांगलेच प्राप्त होईल. नुसत्या संतांच्या दर्शनानेही मन प्रसन्न होते. त्यांच्या दर्शनानंतर काहीतरी स्तुत्य संकल्प करा, त्या संकल्पाच्या सिद्धीसाठी प्रयत्न करा, फळ मिळतेच. आपले मित्र, नातेवाईक यांना धर्ममार्गावर चालण्यासाठी प्रेरणा द्या. संतांप्रति आत्मीयता म्हणजे साक्षात परमेश्वराशी आत्मीयता होय. संत हे आपल्याला परमात्म्यासारखेच असतात.
तुम्ही जीवनात किती धन कमावला यापेक्षा तुमची मुले धार्मिक, सुसंस्कारित व्हावीत यासाठी परिश्रम घ्या. कारण मुले हीच आपली खरी संपत्ती होत. तुम्ही किती कमविला यापेक्षा तुमची मुले कशी आहेत, यावरूनच समाजात तुमची प्रतिष्ठा असते. सुसंस्कारित पिढी घडविणे ही काळाची गरज आहे.
- गौतम मुनीजी