काशी, हिमालय, गंगेपेक्षाही संत श्रेष्ठच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:02 PM2019-09-14T15:02:47+5:302019-09-14T15:51:08+5:30
तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही शुचित्व देतात.
- हभप भरतबुवा रामदासी, बीड.
संतांचे श्रेष्ठत्व तीर्थापेक्षाही महान आहे. या जगात तीन गोष्टी अत्यंत पवित्र आहेत. काशी क्षेत्र, हिमालय आणि गंगा. ...पण संत या तिघांपेक्षाही पवित्र आहेत. आपण म्हणाल कसे. .? तर या प्रश्नाचे उत्तर आपण क्रमवार बघु या. ..!काशी क्षेत्र सर्वात पवित्र आहे. ज्या साधकाला काशी क्षेत्री मृत्यू येतो, त्याला पुन्हा भव चक्राच्या आवर्तनात यावे लागत नाही. त्या साधकाला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. पण हे सर्व त्या काशी क्षेत्रात राहणाऱ्यासाठीच आहे. समजा एखादा व्यक्ती अन्य ठिकाणी मृत्यू पावला तर, त्याचा उद्धार काशी करणार नाही. माउली म्हणतात;
मोक्ष देऊनी उदार! काशी होय कीर! परी वेचणे लागे शरीर ! तये गावी !!
आता मला सांगा मरण कुणाला आवडेल. ...? ही मरणाची अट जाचकच नाही का. .? मरणानंतर मोक्ष मिळणार हे खरे. ..पण सगळ्यांना काशीतच मरण येईल हे कसं शक्य आहे. .? जर मग अन्य ठिकाणी मृत्यू आला तर, मोक्ष मिळणारच नाही का. .? अहो. ..! संतांच्या तर फक्त दर्शनातच मोक्ष आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अलिंगणे घडे मोक्ष सायुज्यता जोडे!
हिमालय हा ही सर्वात पवित्र आहे. परंतु हिमालयाची यात्रा करण्यासाठी शरीर सदृढ पाहिजे. जवळ पैसा पाहिजे. शिवाय यात्रा करतांना हा देह जर त्या हिमालयावर पडला तरच, मोक्ष प्राप्ती होते. संत दर्शनात पैसा खर्च करण्याची गरज नाही व त्यांच्या सानिध्यात मरण्याचीही गरज नाही. फक्त कृपा दृष्टीनेच मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; हिमवंतु दोष खाये ! परी जीविताची हानी होये ! तैसे शुचित्व नोहे ! सज्जनांचे !!
सर्व तिर्थात गंगा अत्यंत पवित्र आहे. गंगा स्नानाचे पुण्य अवर्णनीय आहे. गंगा स्नान घडले तर, देह पवित्र होतो. पण. ..या गंगा तीर्थाचीही मरण्याची अट आहेच. गंगेत मृत्यू यावा लागतो. तरच जन्म मरण परंपरा टळते. माऊली म्हणतात; शुचित्वे गंगा होये ! आणि पाप ताप ही जाये! परी तेथे आहे ! बुडणे एक!!
संताजवळ मात्र मोक्ष प्राप्तीसाठी कुठल्याच जाचक अटी नाहीत. अहो. ...! संताजवळच जगातली सगळी तीर्थे शुचित्वासाठी येतात.
गंगेत पापी लोक स्नान करतात, त्यामुळे गंगेलाही अपवित्रपणा येतो. हा अपवित्रपणा जाण्यासाठी गंगेलाही संताच्या चरण रजाचा आश्रय घ्यावा लागतो. संतांनी जर गंगेमध्ये स्नान केले तरच हा अपवित्रपणा नष्ट होतो. माऊली वर्णन करतात,
संताचेनि अंग लगे! पापाते जिणणे गंगे ! तेणे संत संगे! शुचित्व कैसे!!
तीर्थाला जे तीर्थपण येते ते संतांमुळेच येते. संत हे तीर्था लाही शुचित्व देतात. एवढा महान अधिकार संताचा आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात;
तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया.
!पर्व काळ पायतळी वसे वैष्णवा !!
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 )