- नीता ब्रह्मकुमारीभारत हा एक संस्कृतिप्रधान देश मानला जातो. भारताची प्राचीन संस्कृती ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या मार्गाने पुढे चालणारी, अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी मानली जाते. म्हणून प्रत्येक सण-प्रसंगात दीप प्रज्वलन, दिवा लावणे या प्रथा दिसून येतात. पण आज हीच संस्कृती अंध:काराकडे जात आहे. वाढदिवसाला ओवाळणी करून, तिलक लावून शुभकामना देण्याची पद्धत आज मेणबत्ती विझवून हॅपी बर्थडे बोलणारी झाली आहे. भारताची प्राचीन संस्कृती विसरून पाश्चात्त्य देशाच्या भोगविलासी संस्कृतीशी आपण हात मिळवत आहोत. भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती, भूक लागल्यावर दुसऱ्याच्या हातचे काढून खाणे ही आहे विकृती, पण खात असताना कोणी आले तर त्यालाही खावयास देणे ही आहे संस्कृती. ही संस्कृती भारतामध्ये ‘अतिथी देवो भव’ म्हणून सांभाळताना दिसते. घरी आलेल्या पाहुण्याला देवाचेच रूप समजून त्याचा पाहुणचार प्रेमाने केला जातो. अनेक पद्धती आणि अनेक उत्सवांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. प्रत्येक उत्सव आणि प्रथांमागे अनेक रहस्ये लपली आहेत. पण त्या रहस्यांना आपण कधी जाणून घेतले नाही. म्हणून आज तसे आपल्यामध्ये संस्कारही दिसून येत नाहीत. संस्कार आणि संस्कृती यांचा संबंध समजून घेण्यासारखा आहे. संस्कार अर्थात दैनंदिन जीवनामध्ये नियमितता आणणे, व्यवहारामध्ये सदगुणाचा समावेश करणे, प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्यता आणून धर्मयुक्त कार्य करणे हे संस्कारित असण्याची निशाणी आहे. अशा संस्कारी मनुष्यांनी अनेकांना जीवन जगण्याची कला शिकवली, त्या कलेला संस्कृती म्हटले जाते. वर्तमान परिस्थिती मात्र वेगळी दिसून येते. विज्ञानाने मनुष्याला अनेक साधने आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्याचबरोबर आपली मानसिकताही दिवसेंदिवस बदलत गेली. अनेक चुकीच्या समजुती समाजामध्ये पसरत गेल्या आणि हीच सुंदर संस्कृती आज लोप पावताना दिसत आहे.
हीच संस्कृती आज अंध:काराकडे जात आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:49 AM