सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून तितकंच दु:खही पाठलाग करत राहतं याची फार मोठी उदाहरणं आपल्या महाग्रंथांमध्ये आहेत. ज्यांना काळाने धर्मग्रंथ म्हटलं आहे ते म्हणजे महाभारत आणि रामायण. या दोन्ही ग्रंथांत सुखापेक्षा दु:खच अधिक प्रमाणात खच्चून भरलंय. म्हणून तर अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली आणि तीसुद्धा युद्धभूमीवर! उत्तम पुरुष म्हणून जगण्यासाठी जे जे म्हणून उत्तमोत्तम गीतेत सांगितलं आहे ते अत्यंत वास्तव आहे. महाभारतातलं पहिलं दु:ख म्हणजे कौरवांचे आईवडील आंधळे आहेत. जिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली असते तिथे गुपचूप संकटे आणि दु:ख अंग चोरून प्रवेश करते. त्यामुळे कौरवांच्या मनात साºया षड्रिपूंनी प्रवेश केला. त्याचमुळे पांडवांचा द्वेष करून त्यांना द्यूतात हरवून त्यांच्यावर वनवास लादला. कुणाला भरल्या घरातून काढणे हे फार मोठे दु:खच असते. कुण्या परस्त्रीला अपमानित करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा मोठा दुर्दैवाचा, महादु:खाचा भाग म्हणावयास हवा. असे अनेक प्रसंग जर महाभारतात बघितले तर दु:ख आणि दु:खच आहे.रामायणात जन्मदाता पिताच पत्नीच्या वचनात अडकल्यामुळे पुत्र रामचंद्राला वनवासात पाठवतो. त्यानंतर वनवासातसुद्धा रामाला सुखाचे चार क्षण गवसले असते, पण दुष्ट रावणाने त्याच्या पत्नीला पळवून नेलं आणि रामचंद्र रावणाशी युद्ध करीत बसले. युद्धानंतर सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त करून अयोध्येला परतले तर काही दिवसांतच धोब्याच्या संशयावरून सीतेला पुन्हा वनवासात पाठविण्यात आले. एका स्त्रीला आणि तेही गर्भधारणा झाल्यानंतर असं वाºयावर सोडणं किती मोठं दु:ख. अशा या धर्मग्रंथात सुख जवाइतकं आणि दु:ख डोंगराइतकं असलेलं दिसतं.-विजयराज बोधनकर
स्वत:शी भांडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:35 AM