सोलापूर : ‘माणसाच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. हा संतांनी दिलेला ईश्वराचा पत्ता होय, म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा’, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले.
जीवनाला जर प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर सत्संग करणे गरजेचे आहे. संतांचे दर्शन म्हणजे जीवनातील सूर्योदय. संतांची वाणी म्हणजे अमृतच. संत आपल्या वाणीतून अमृत देऊन लोकांच्या ज्ञानाची तहान-भूक तृप्त करतात, म्हणून आनंदाने वाणीरुपी रस प्राशन करा. महापुरुषांचे आचार व विचार इतके प्रभावित असतात की जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादात असते.
संतांच्या सान्निध्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या दिव्य संदेशानुसार आपले आचरण ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आचार्य महाराज श्रीमद् रत्नप्रभ सुरीजी महाराज यांनी आजच्याच दिवशी ओसवाल समाजाची स्थापना केल्याचा इतिहास सांगितला. यावेळी सागरमुनीजी म्हणाले, देव, धर्म आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे मुख्य तत्त्व होय. या तत्त्वांची आराधना केल्यास आपले जीवन उच्च शिखरावर पोहोचेल. सत्य-असत्य, लोक-देवलोक, सुदर्शन आदींबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले.
संसार करा, व्यापार करा, धर्म करा, पण आपली बुद्धी जागृत ठेवून करा. आपल्या हातून रोजच्या दैनंदिन व्यवहारात दुष्कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या. धर्मात आळस नको, आळस झटकून धार्मिक कार्यास श्रद्धेने प्रारंभ करा. श्रद्धा हा माणसाचा स्थायीभाव आहे. परमार्थात तर श्रद्धेचे महत्त्व अपरंपार आहे. संतांच्या चरणी नितांत श्रद्धा असल्याशिवाय साधकांचे परमार्थात प्रगती होणे शक्य नाही.- गुरु आनंद कमल कन्हैया, सोलापूर