भाव तेथे देव! ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे ध्येय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:29 PM2019-05-13T12:29:48+5:302019-05-13T12:35:00+5:30
एखाद्या चांगल्या मित्राबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला चांगली माहिती झाली, त्याच्याबद्दलचे चांगले गुण व स्वभाव समजला तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा आदरभाव निर्माण होतो.
एखाद्या चांगल्या मित्राबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला चांगली माहिती झाली, त्याच्याबद्दलचे चांगले गुण व स्वभाव समजला तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा आदरभाव निर्माण होतो. म्हणजे त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर आपण त्याच्याशी कसे वागतो त्यावरून त्याच्या प्रामाणिकपणाची भावना आपल्या लक्षात येते. त्या व्यक्तीच्या मनाचा भाव पाहता येतो. थोडक्यात नवीन भाव असा निर्माण होतो. व्यक्ती-व्यक्तींच्या मनात याचे उदाहरण पाहता येईल. कारण मनाच्या स्वभावानुसार भाव बदल राहातो. भाव हा मुळातच स्वभावत: बुद्धीचा असतो. आपल्या घरात अनेक व्यक्ती आहेत. तरीपण एकमेकांबद्दलचा उपजत भाव असतो. पहिल्या ज्या उपजत भावाने ज्या अपेक्षा मनात उत्पन्न झाल्या असतील, त्याप्रमाणे भाव टिकतो.
‘भाव तेथे देव’ म्हणजे अनन्यभाव असल्याशिवाय आपल्या कर्तृत्वाचा सुगंध दरवळत नाही. साधकावस्था असताना भक्तांचा पण एकनिष्ठ भाव असतो. तो सर्वस्व एका परमेश्वरावर भाव ठेवून तोच माझा पाठीराखा आहे, तो सुखाचे सार आहे, त्यालाच आमचे सुख-दु:ख सांगू, ही भावना त्यांच्या मनात असते. व्यावहारिक माणसाप्रमाणे साधकाचा भाव बदलत नाही. व्यवहारामध्ये पती-पत्नीचे पहिले प्रेम पुढे ओसरते किंवा वाढते तसे साधकाचे नसते. त्याच्याकडे विश्वासाची परिणती असते. साधकाकडे प्रेम, कृतज्ञता, पूज्यभाव, शरणागती असते. साधकाचा भाव हळूहळू स्थिर होतो. जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत धीर धरणे हे त्याच्या दृढतेवर अवलंबून असते. साधक देहादी प्रपंचात सापडत नाही. म्हणून मनाला वारंवार जागृती देऊन भाव दृढ व स्थिर ठेवतो. व्यावहारिक माणसाचा भाव कमी-अधिक होत राहतो. प्रत्येकाने चिंतामुक्त, दु:खमुक्त व्हायचे असले तर स्थिर भाव ठेवावा. साधकावस्थेत जीवन जगावे. हेच साधन मोक्ष किंवा ईश्वरप्राप्तीचे होय. ईश्वरप्राप्ती हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.
प्रपंच व परमार्थ या दोन्ही ठिकाणी देवच सहकारी आहे. हा साधकाचा दृढ विश्वास असतो. म्हणून संतांनी म्हटले आहे, ‘‘आमुची विश्रांती। तुमचे चरण कमळापती । हेचि एक जाणे । काया वाचा आणि मने’’ ही भावावस्था साधकाची असते. त्यातच त्यांचे सुख सामावलेले असते. निर्भयता, सुख, स्थैर्य, विश्राम हे देवापासूनच मिळतात, हा विश्वास त्यांच्या मनात दृढ असतो. तेच ते जपतात. त्यातूनच त्यांना समाधान मिळते. साधकाची भावावस्था स्थिर असते. तोच त्यांचा एकनिष्ठ भाव असतो.
- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)