जगण्याची कला शिकविणारे आध्यात्मिक गुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:51 AM2019-05-13T00:51:17+5:302019-05-13T00:51:36+5:30
आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन.
आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचे आध्यात्मिक कार्य, शांततेसाठी केलेले प्रयत्न, योगाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान, वेगवेगळ््या क्षेत्रांतील थक्क करणारे
काम यावर टाकलेला दृष्टिक्षेप...
आनंदाने जगण्याची कला म्हणजेच ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ असा नुसता उल्लेख जरी केला, तरी श्री श्री रवीशंकर यांचे अहोरात्र सुरू असलेले कार्य डोळ््यासमोर उभे राहते. आध्यात्मिक शांती, योगा, जगण्याची नवी दृष्टी देणारी प्रेरणा, जेथे जेथे संघर्ष आहे, तेथे हळूवार फुंकर घालण्याचे काम, शेतकऱ्यांना केलेली मदत अशा विविध कारणांनी श्री श्री रवीशंकर यांचे काम आपल्या सदैव स्मरणात राहते.
यमुनातटी जागतिक शांततेसाठी केलेले प्रयत्न असोत, की राम मंदिरासाठी केलेली मध्यस्थी असो, त्यातील त्यांचा पुढाकार नेहमीच चर्चेत राहिला आहे.
योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदानही अमूल्य आहे. जगण्याची कला शिकवताना त्यातील मन:शांतीचे, आनंद मिळवण्याचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत हे त्यांनी त्यांच्या जगभरातील अनुयायांना शिकवले. त्यातून कोट्यवधी लोकांचे जगणे समृद्ध केले. अजूनही करत आहेत.
जगात जेथे संघर्ष आहे, तेथे त्यांनी शांततेसाठी धाव घेतल्याचे दिसून येते. इसीसचा संघर्ष, कोलंबियातील गृहयुद्ध, इराकमधील तापलेले वातावरण अशा अनेक ठिकाणी त्यांनी शांततेसाठी पुढाकार घेतला. विद्रोहींना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात रवीशंकर यांच्या प्रयत्नांनी यश मिळाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी किंवा फुटीरतावाद्यांनी हाती घेतलेल्या बंदुका खाली ठेवाव्यात म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यात त्यांचाही समावेश आहे. तेथे सामाजिक चळवळ सुरू करण्यात, १२ हजार काश्मिरींना एकत्रित आणण्यात त्यांनी मोलाचा पुढाकार घेतला. उत्तर पूर्व भारतातील सात राज्यातील प्रमुख विद्रोही गटांना एकाच मंचावर आणून त्यांच्यात समेट घडवून आण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तेथे विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे कामही त्यांनी केले.
मन:शांती आणि आंतरिक स्थैर्य कसे प्राप्त करावे, याची शिकवण देण्याचे कामही रवीशंकर यांच्यातर्फे अखंड सुरू आहे. ज्यांनी शिकवलेली जगण्याची कला- आर्ट आॅफ लिव्हिंग- जगभरातील ४५ कोटी जणांनी आत्मसात केली आहे, यातच त्यांच्या कामाचे यश सामावले आहे. त्यात शेतकऱ्यांपासून कॉर्पोरेट कल्चरपर्यंतच्या सर्व वर्गांचा समावेश आहे, हे विशेष. देशातील ४१ कोरड्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी धडपड, जगातील ६५ देशांतील आठ लाख कैद्यांचे पुनर्वसन, आपत्कालीन क्षेत्रात मदतकार्य, शिक्षणाचा प्रसार करण्यापर्यंत अश्या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
१९ राज्यांतील २२ लाख शेतकºयांसाठी झिरो कॉस्ट शेतीचे प्रशिक्षण, स्वच्छता मोहीम, ग्रामीण भागात सामुदायिक नेतृत्वासाठी ४० हजार खेड्यांतील सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण, ३६ देशात आणि भारतातील २६ राज्यात आठ कोटी १० लाख वृक्षांचे रोपण, ३८१९ घरे, ६२ हजारांपेक्षाही अधिक शौचालये, १२०० बोअरवेल्स, १५९२ बायोगॅस प्लँट अशी त्यांच्या कामांची यादी चढती आहे. नुकतेच त्यांच्यातर्फे राष्ट्रीय नशामुक्त भारत अभियान सुरू झाले.
जर तुमचे मन तणावमुक्त असेल, तरच तुम्ही सकारात्मक विचार करू शकता, असा संदेश रवीशंकर देतात. जगण्याची कला शिकवण्याचे त्यांचे कार्य असेच सुरू ठेवण्याची ऊर्जा त्यांच्याकडून यापुढेही सर्वांना मिळत राहील.