आनंद तरंग - स्त्रीला कोठडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:19+5:302019-09-06T06:00:23+5:30
ज्या घरात, गावात स्त्रीचा आदर होतो अशी घरं, गावं आणि असा समाज पुण्यवंताच्या रांगेत जाऊन बसलेला असतो.
विजयराज बोधनकर
ज्या घरात, गावात स्त्रीचा आदर होतो अशी घरं, गावं आणि असा समाज पुण्यवंताच्या रांगेत जाऊन बसलेला असतो. पण जी माणसं स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजतात अशी माणसं, माणसं म्हणून जगण्याच्या योग्यतेचीच नसतात. स्त्रीचं प्रेम ज्याला मिळालं तो भाग्यवंत समजावा. आई, बहीण, मुलगी, पत्नी, मैत्रीण अशा विविध भूमिकांतून ती दिसत राहते. घराला, मनाला खऱ्या भावनिक अर्थाने स्त्री सांभाळत असते. ती घराला, नात्यांना तुटू देत नाही. अशा स्त्री तत्त्वाचा आदर करणे प्रत्येक पुरुषाचा धर्म असायला हवा. स्त्रियांचा अनादर करणाºया घरात, समाजात कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कधीच सुख, शांती लाभत नाही. स्त्री म्हणजे पुरुषाची, समाजाची गुलाम नसते, सार्वजनिक ठिकाणीसुद्धा समाजाने स्त्रीकडे आदराच्या वृत्तीनेच बघितले पाहिजे. काळाने पुरु षाला स्वातंत्र्य आणि स्त्रीला घर नावाची कोठडी, असा दुजाभाव अजूनही आढळतो. ग्रामीण भागात आजही स्त्रीला निर्णय घेण्याचा अधिकार समाज देत नाही. शहरात मोठ्या प्रमाणात सर्व निर्णयात ती सहभागी होताना दिसते. हा देश छत्रपती शिवाजी, आंबेडकर, महात्मा फुल्यांचा, सावरकरांचा देश आहे, आज शहरात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कामे करतात, पुरुषांची मक्तेदारी असणाºया सर्व क्षेत्रीय भागात स्त्रियांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली आहे. चूल आणि मूल ही विचारधारा केव्हाच मोडीत निघाली आहे. भावनिकदृष्ट्या हळवी असलेली स्त्री वेळ पडल्यास दुर्गाही होऊ शकते, याचे भान पुरुषी अहंकार असणाºया समाजाला आले पाहिजे. श्रीगणेशाच्या सोबत रिद्धीसिद्धीचे चित्र समाज दिवाळीला मोठ्या आदराने पुजतो. पण वास्तवात मात्र तसा वागत नाही. दुर्गा, अंबामातेची पूजा करताना आपण स्त्री तत्त्वाची पूजा करतोय, असा विचार मनात आला तर देश अधिक संपन्न आणि आधुनिक होऊ शकतो.