जीवन जगण्यासाठी मनाचाच आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 08:54 AM2020-02-10T08:54:30+5:302020-02-10T09:04:54+5:30
माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला.
माणसाने मनाचे मानस शोधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजूनपर्यंत करतात. आध्यात्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींनी केला. परंतु मनाचा मुख्य ठावठिकाणा कुणालातरी सापडला का, हा प्रश्न नेहमी आपल्या मनात घोळत राहतो. आपल्याला उगीचच मनाचे कंगोरे शोधण्याची सवय असते. आपल्या भाव-भावना, वासना, स्मृती, कल्पना, बुद्धी, जाणिवा यांच्याद्वारे आपण मनाचा विचार करतो. आपण एखाद्याच्या कृतीतून त्याच्या मनाची कल्पना करतो. त्याचे मन चांगले की वाईट, त्याच्या भावना काय असतील, त्याची आंतरिक शक्ती काय असेल, ही सर्व कल्पना मनावर आधारित असते. एखादी कृती जशी घडते तसा माणूस माणसाचे निरीक्षण करतो. ते निरीक्षण करण्यासाठी मनाचीच तर आवश्यकता असते. मनाची उजळणी आंतरिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
एखाद्या व्यक्तीने मानसिक टेन्शन घेतले. तो सतत त्याच विचारात राहातो. तर आपण त्याला मनोरुग्ण असे म्हणतो. मनोरुग्ण म्हणजे त्याच्या मनात सतत त्याच गोष्टींचा विचार येतो. मनोवैज्ञानिकांनीसुद्धा मनोरुग्णाला समजून त्यावर उपाय सांगायची पद्धती अवलंबिली आहे. समजा, एखाद्याला भुतांनी झपाटले म्हणजे काय- तो सतत त्या भुतांनी झपाटल्याचीच कल्पना करतो. भूत हीच मुळात भयावह कल्पना वाटते. मनाच्या कल्पना अनेक आहेत. कोणत्याही गोष्टीचा प्रथमत: मनावर प्रभाव पडतो अन् मग ते मन त्यात गुंतत असते. कारण सर्वांच्या मनात भूत नावाची कल्पना घट्ट होऊन जाते. मग त्याच्या मानसिकतेत सतत त्याचाच विचार येतो. जीवन जगताना मनाचाच आधार घ्यावा लागतो. त्या मनाला तुम्ही काहीपण समजा पण ते आहे. त्यानुसारच ह्या सृष्टीचा खेळ चालला आहे. सृष्टीचे भवितव्य हे मनाशी किंवा दैवीमानवावरच अवलंबून आहे.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)