अध्यात्म - पूर्वोत्तर क्षण दुर्लभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:32 AM2019-10-01T05:32:20+5:302019-10-01T05:32:54+5:30
विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो.
- बा. भो. शास्त्री
श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, ‘‘जीव क्षणा एकामाजी ते एक आपजवी आपणयासी जे जन्माचा हस्त्री निस्तरो न सरे.’’ विवेकी पुरुष क्षण वाया जाऊ देत नाही. क्षणाची खरी किंमत धावपटूला विचारा तो सांगेल, फक्त एकाच क्षणात जय किंवा पराजय मिळत असतो. निडणुकीत एकाच मताने विजय किंवा पराजय होतो. जन्माचा क्षण आठवत नाही. मृत्यूचा क्षण आवडत नाही. मधला क्षण सापडत नाही. त्याच क्षणाचा विचार संत तुकोबा करायला सांगतात.
‘क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू’
एकच ठिणगी जंगलाला आग लावते. पण तेव्हाच तिच्यावर एकच पाण्याचा थेंब पडला तर ठिणगी विझते व जंगल वाचतं. प्रत्येकाच्या जीवनात चांगले क्षण येतात व जातात. थांबत नाहीत. परतही येत नाहीत. ते वेचावे लागतात. पचवावे लागतात. जगावे लागतात. कणाकणाने संघटित झालेल्या दगडाच्या पायावर इमारत उभी राहते. एकवटलेल्या निश्चल क्षणावर शाश्वत मुक्ती आपली वाट पाहत असते. ज्ञानेश्वरीत एक गोड ओवी आहे.
‘‘ते एकवटूनी जियेक्षणी
अनुसरलेगा माझिये वाहानी
तेव्हाचि तयांची चिंतवनी
मजची पडली’’
स्वामींनी या सूत्रातून अखंड प्रेमाचा सल्ला दिला आहे. संसाराचा आरंभ चांगलाच आहे. पण शेवट करता आला पाहिजे. मंदिर बांधणं सोपं आहे. पण पावित्र्य टिकवणं महत्त्वाचं आहे. मी व्यसन सोडणार हा संकल्प चांगला, पण सिद्धीला नेता आला पाहिजे. सर्वांच्याच जीवनात चांगल्या सद्भावना कधी कधी निर्माण होतच असतात. त्यांना निश्चयाचं बळ नाही मिळालं तर त्या विरून जातात, मिळालं तर त्या मजबूत होतात.