आनंदाचे डोही आनंद तरंग : चंद्रभागेच्या तीरावरून सुरू होते अंतरंग साधना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:33 AM2019-07-18T11:33:25+5:302019-07-18T11:34:45+5:30
एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल.
वारी हा अत्यंत निर्मळ स्वरूपाचा प्रवाह आहे. त्यात वषार्नुवर्षे सहभागी होणारे निष्ठावान वारकऱ्यांचे फड, त्यातील भजनाची दिव्य परंपरा ही रोमांचाचे रान उभे करणारी आहे. महाराष्ट्रातील सकल संतांनी आम्हाला वारी काय आहे, हे शिकविले आहे. संत-देव आणि भक्त असा भावभक्तीचा सोहळा अनुभवण्यास मिळतो. वारीत हा वेगळा भक्तिभाव दिसून येतो.
खरे तर आपली जीवनाची वारी जाऊ नये, यासाठी संतसंगतीत वारी करणे गरजेचे आहे. संत तुकाराममहाराजांचे उद्गार आहेत,ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूच्या धारा, कोठे रोमांच शरीरा, तुका म्हणे कोठे वेचिला अभेद्याचा काला.. असा अद्वैताचा सोहळा आहे.
पंढरी समीप असणाऱ्या वाखरीवर संतांच्या सर्व दिंड्या एकत्र येतात. तिथे महासमन्वय घडतो. संतांचा मेळा जमतो आणि पुढे पंढरीकडे वाटचाल होते. पुढे देवाचाही रथ पुढे येतो. संतांची आणि देवाची भेट होते. बघा, ही काय भावरम्यता आहे. वारकरी जेव्हा पंढरीत प्रवेश करतात त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू येतात. याविषयीचा एक सुंदर अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिला आहे. तुकोबांच्या अभंगानुसार, पावलो पंढरी, क्षमा लिंगणी, संत या सज्जनी निवविलो, पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला हा सखा मायबाप, पावलो पंढरी, आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे... अशा स्वरूपाचा एक कृतार्थतेचा भाव या सोहळ्यात असतो. खरे तर वारीत पोहोचले म्हणजे संपले नाही. तर चंद्रभागेस्नान, विधीवत हरिकथा आहे. हरिकथा श्रवण आणि चिंतनही केले जाते. येथूनच चंद्रभागातीरावरून अंतरंग साधना सुरू होते.
वारीत एका झेंड्याखाली आपण सर्व जण एकत्र येतो. त्यातील भक्तिभाव आणि भावरम्यता ही अद्भुतच आणि अलौकिक आहे. या विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... तेथं सुद्धा एका तत्त्ववेक्त्याने म्हटले होते, आचारा विचारांची पालखी, खऱ्या अर्थाने पसायदानाच्या पंढरपुरी गेली पाहिजे, त्यामुळे देवालाही समाधान वाटेल. खरे तर असा एक आधुनिक अर्थ आपण काढायला हरकत नाही. आज वारीत काळानुरूप बदल होत आहेत. स्वच्छतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने चांगले काम होत आहे. वारकरी जीवनही सजग आणि जागे झालेले आहे. निर्मळवारी, पवित्र वारी असाही बदल होत आहे. हा बदल अमूलाग्र आहे.
आनंदाचे डोही आनंद तरंग