मनाच्या ताकदीसाठी नामस्मरण करा : ह.भ.प. बाबामहाराज सातारकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:17 PM2019-07-26T12:17:08+5:302019-07-26T12:18:21+5:30
मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो.
मन हे देखील एक इंद्रिय आहे. मन आणि इंद्रियांचा संगम होतो तेव्हा एकरुपता प्राप्त होते आणि इंद्रियांची एकाग्रता होणे म्हणजे तप. जेव्हा मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा कृती घडते. यातील एकाने जरी आपले काम चोख केले नाही, तर कृतीमध्ये विसंगती होते. परंतु मन दुबळे झाले तर माणूस खचून जातो. म्हणून मनाची ताकद वाढविण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे, असे मत प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या हरिपाठावर ते निरूपण करीत आहेत. हभप बाबामहाराज सातारकर म्हणाले, मन आणि इंद्रियांची सांगड घातली जाते तेव्हा तप सुरू होते. परंतु तपामध्येदेखील व्यत्यय असतो. तप करीत असताना मनात अहंकार आणू नये, अन्यथा तुम्ही केलेला परमार्थ सफल होणार नाही. जर अहंकारापासून दूर राहायचे असेल तर हरिनाम घ्या. एकदा नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर निष्ठेने पांडुरंगाचे रुप डोळ्यांसमोर आणावे. तुमच्याकडे निष्ठा असेल तर ही गोष्ट नक्की साध्य होते. इतकी वर्षे झाले आज वृद्धापकाळातदेखील तितक्याच ताकदीने मी भजन करतो आहे. त्याचे कारण नित्य नामस्मरण हेच आहे. हरिपाठात देखील नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. हरिपाठ हा सोपा नाही, यामध्ये सर्व तत्त्वज्ञानाचे सार आहे. परंतु लोकांना हे तत्त्वज्ञान कळावे म्हणून तो सोप्या भाषेत मांडला आहे.