पळे तो परतो लाहे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:04 AM2019-04-16T05:04:09+5:302019-04-16T05:04:18+5:30
घरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही?
- बा.भो. शास्त्री
घरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही? अडचणी अनेक असून शकतात, बिमारी, बदनामी, अपयश, आर्थिक टंचाई म्हणून आत्मघातकी विचार करून ध्येय पतित व्हायचं? सुंदर जीवनातून पळ काढणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे. हे सूत्र बुद्धीला अभयाच्या जागेवर स्थिर करतं. निश्चयाचं बळ देतं, उमेद वाढवितं. जीवन हा संग्राम आहे. चांगल्या रोडला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतातच. बाहेर माणसं आत विकार हा लढा चालतच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन’
कुठल्याही स्थितीत निश्चय व योग्य नियोजन असलं की, माणूस परिस्थितीवर मात करू शकतो. अर्जुन असाच घाबरला होता. युद्ध सोडून पळतो म्हणाला. हताश होऊन मटकन रथात बसला. श्रीकृष्णाने प्रिय अर्जुनाला एक खरपूस शिवी दिली. ‘क्लैब्य’ म्हटलं. याचा अर्थ मराठीत नपुंसक असा होतो. अर्जुना! तू योद्धा आहेस. पळू नकोस, परत फिर. ‘उत्तिष्ठ’ उठ. ‘युध्यस्व’ हाच गीतेचा संदेश स्वामी साध्या सोप्या मराठीत एकाच सूत्रात सांगतात. कारण आपण सर्वच अर्जुन आहोत. करू की नको, या पेचात आपण नेहमीच असतो. एका बाजूला भावना व दुसऱ्या बाजूला कर्तव्य, इथे आपण उभे असतो. सत्य असत्याच्या गोंधळात सापडतो. गीतेचे संस्कृत श्लोक सामान्य लोकांना कळत नव्हते, म्हणून भाषा बदलून स्वामी गीतार्थ सांगितला. माणूस उभा केला. चालायला गती व विचाराला मती दिली. ती ऊर्जा प्रत्येकात आहे, म्हणूनच ‘पळे तो परतो लाहे.’