शिक्षक आणि श्रीगणेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:50 AM2019-08-30T05:50:09+5:302019-08-30T05:50:14+5:30
इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.
उच्च भावनेने कधीही व्यक्त न होणारे, विचारांची शून्यता घेऊन जगणारे, साहित्य, कला, संगीत याचा कसलाही गंध नसणारे, जन्माला घातले म्हणून जगणारे, पोट भरण्यापुरते शिक्षण घेऊन पोटासाठी जगणारे, मुले जन्माला घालून त्यांनाही तसेच जगावे अशी आशा बाळगणारे, कला वगैरे एक निरर्थक गोष्ट आहे असे भासवणारे, अशा धाटणीचा मोठा समाज आजही कसा काय शिल्लक राहिला? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.
इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. निर्जीव पालकांच्या नकारात्मक विचारांमुळे पुढची पिढी सक्षम होण्याऐवजी त्याच विचारात खितपत पडून आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा कधीच हातभार लागत नाही. रस्त्यांवर घाण करणे, पाशवी शक्तीच्या आहारी गेल्यामुळे पाशवी वृत्तीला सहकार्य करीत राहणे, उत्तम कार्यात विघ्न आणणे, हे सर्व उपद्व्याप क्षुद्र विचाराने प्रेरित होऊन करीत राहणे. असा मोठा लोंढा राजकारणात शिरल्यामुळे देशाला अधिकच धोका निर्माण होत आहे. यासाठी केवळ एकच घटक काम करू शकतो तो म्हणजे शालेय शिक्षक. शिक्षक हा आजही पूज्य आहे, तो पिढी घडवितो, समाज बदलविण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांच्या हातात नव्या पिढीला घडविण्याचे महान कार्य नियतीने सोपवले असते. विद्यार्थी नावाच्या ओल्या मातीला देशाच्या विकासासाठी जबाबदारीने घडविणे हे फक्त शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाला आव्हान असते.
ज्या शिक्षकांनी हे समाजकार्य पेलले ते खऱ्या अर्थाने बुद्धिनायक श्री गणेशाच्या कार्याला हातभार लावत आहे, असा संदेश निर्माण होऊ शकतो. बुद्धिनायक गणपती आणि शिक्षक यांची भूमिका एकच असते. नव्या पिढीला बुद्धीवादी बनवून जुन्या रटाळ विचारसरणीला विसर्जित करतात, म्हणून गुरूला दैवत म्हटलं आहे..
-विजयराज बोधनकर