गोंधळ हा देवीची स्तुती व पूजा करण्याच्या एक प्रकार आहे. घरातील मंगल कार्य व्यवस्थित पार पाडल्याबद्दल, अंबाबाई, भवानी, रेणुका यांसारख्या कुलदेवींचे उपकार स्मरणाचा हा विधी असतो.गोंधळी लोक गोंधळ घालण्याचे काम करतात. गोंधळ घालण्यासाठी चार माणसे भाग घेतात. गीत आणि कथा यांच्या साहाय्याने निरूपण करणारा असतो, तो मुख्य गोंधळी असतो. त्याला ‘नाईक’ म्हणतात. निरूपण करताना मध्येच विनोदी प्रश्न विचारून, निरूपणाला गती देणारा एक असतो, तो त्याचा सहायक असतो. आणखी दोघे त्यांना साथ देत असतात. संबळ आणि तुणतुणे या वाद्यांनी गीतांना साथ दिली जाते.गोंधळाची मांडणी करताना, गोंधळी एका पाटावर नवे वस्त्र अंथरून, त्यावर तांदळाचा चौक करतात. चौकाच्या चार कोपºयावर चार व मध्ये एक, याप्रमाणे खोबºयाच्या वाट्या, त्याच्या शेजारी सुपाºया, खाणकाम, हळकुंडे व केळी या वस्तू मांडतात. चौकाच्या मध्ये कलशाची स्थापना करून, त्यावर विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून, त्यावर एक नारळ ठेवला जातो. मग यजमान देवीची स्थापना व पूजा करतात.नाईक गोंधळाला प्रारंभ करताना प्रथम गण म्हणतो. नंतर जगदंबेचे स्तवन करतो. त्यानंतर, अनेक देवतांना गोंधळासाठी पाचारण केले जाते. त्यानंतर, नाईक पूर्व रंग आणि उत्तर रंग अशा दोन विभागांत अनुक्रमे देवीची प्रशंसा व एखादे लोककथात्मक संगीत आख्यान सांगतो. शेवटी देवीची आरती होते आणि गोंधळ संपतो.देवी आणि संस्कारपूर्वीच्या काळी सोळा संस्कार केले जात. १) गर्भाधान २) पुसंवन ३) सीमंतोन्नयन ४) जातकर्म ५) नामकरण ६) निष्क्रमय ७) अन्नप्राशन ८) चौल ९) उपनयन १०) महानाम्नी व्रत ११) महाव्रत १२) उपनिषद व्रत १३) केशांत १४) समावर्त १५) विवाह, १६) अन्त्येष्टी असे पूर्वी संस्कार केले जात. आता माणसास पुढील आधुनिक सोळा संस्कारांची आवश्यकता आहे. प्रत्येक माणूस अशा आधुनिक संस्कारांनी जर सामर्थ्यवान देवी उपासक झाला, तर समाजातील राक्षसांचा नाश होऊ शकेल.आधुनिक सोळा संस्कार१) शरीराचे आरोग्य : योग्य ऋतूप्रमाणे आहार, योग्य व्यायाम, योग्य विश्रांती, स्वच्छता, निर्व्यसनीपणा, आनंदी मन, चिंतामुक्त जीवन, नियमितपणा ठेवला, तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.२) मनाचे आरोग्य : मनाच्या स्वास्थ्याकडे प्रत्येकाने लक्ष देणे आवश्यक असते. पंचज्ञानेंद्रियांचा योग्य उपयोग करून घ्यावयास हवा. कारण यांचा संबंध थेट मनाशी असतो. कान संगीतामुळे, डोळे निसर्ग सौंदर्य पाहण्याने, नाक फुलांच्या सुगंधाने, त्वचा मायेच्या स्पर्शाने, जीभ षड्रसांच्या सेवनाने तृप्त होत असते. यामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होत असते.३) बुद्धीचे आरोग्य: बुद्धीचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. कोणतेही निर्णय आणि कृती ही भावनेच्या आहारी न जाता, बुद्धी वापरून करावयाची असते. चांगली संगत बुद्धीचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करीत असते.४) ध्येय निश्चिती : समजा, आपण रेल्वेच्या तिकीट खिडकीवर गेलो आणि पाचशे रुपयांची नोट देऊन तिकीट मागितले, तर तो देणारच नाही. तो कारकून विचारणार की, कुठे जायचे आहे? जीवनाचेही तसेच आहे. कुठे जायचे? कसे जायचे? काय करायचे? हे अगोदर ठरवायलाच हवे.५) श्रमसंस्कार : कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी श्रम करायला लाज वाटता कामा नये. भगवान श्रीकृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी पत्रावळी उचलल्या होत्या.६) सर्जनशीलता हवी : कोणतेही काम करताना, क्रीएटीव्हिटी वापरली, तर कामे कमी वेळात, कमी खर्चात, कमी श्रमात आणि देखणे होत असते.७) नावीन्यतेचा स्वीकार: काही लोक नेहमी जुन्याच विचारांनी कृती करीत असतात. ते नेहमी नवीन गोष्टी करायला घाबरतात. नेहमी नवीन-नवीन गोष्टी शिकण्याची मनाची तयारी हवी. म्हणजे प्रगती होण्यास मदत होते.८) शिस्त: जीवनात शिस्तीला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये स्वयंशिस्त असणे जास्त आवश्यक आहे.९) संपर्क कला : आधुनिक कालात कम्युनिकेशन कलेला जास्त महत्त्व आहे, तसेच प्रत्येक गोष्टीचे प्रेझेंटेशन परिणामकारक व्हावयास हवे.१०) सहकार - सहयोग: बºयाच वेळा वैयक्तिकरीत्या हुशार असणारे, टीममध्ये आले की मागे पडतात. ग्रुपमध्ये काम करता यावयास हवे आहे. इतरांना समजून घेऊन, इगो बाजूला ठेवून काम करता यावयास हवे आहे.११) वेळेचे व्यवस्थापन: देवीला आठ किंवा दहा हात का आहेत? तर तिला टाइम मॅनेंजमेंट चांगले जमते. आपणासही वेळेचे व्यवस्थापन करता यावयास हवे .१२) नैतिकता- प्रामाणिकपणा: जीवनात नैतिकता आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे.१३) स्वकर्तव्याची जाणीव: प्रत्येक माणसाला यशस्वी व्हायचे असेल, तर स्वकर्तव्याची जाणीव असावयास हवी आहे.१४) छंद: प्रत्येक माणसाला जीवनात आवडीचा जॉब मिळतोच, असे नाही, पण आवडीचा छंद मात्र जोपासता येतो. मी माझे उदाहरण सांगतो, मला माझा खगोलशास्त्राचा छंद खूप आनंद मिळवून देत असतो.१५) वैज्ञानिक दृष्टिकोन: जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास खूप फायदा होतो. प्रत्येक गोष्टींचा कार्यकारणभाव समजून घेतला, तर खरे काय किंवा खोटे काय, ते समजून येते.१६) प्रश्न सोडविण्याची कला: जीवन जगताना अनेक प्रश्न येणारच. हे प्रश्न कौशल्याने सोडविता यावयास हवे. रागावून, चिडून प्रश्न सुटत नसतात. उद्देश नीट समजून घेतला की, प्रश्न सोडविणे सुलभ जाते. इगो बाजूला ठेवला, तर प्रश्न लवकर सोडविता येतो.देवीची उपासना आपल्यात चांगला बदल व्हावा, यासाठी करावयाची असते. दररोज आपल्यात चांगला बदल व्हावा, म्हणून देवीची प्रार्थना करू या.‘या देवी सर्व भूतेषु, बुद्धीरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यैनमो ऽ नम: ।।
माळ आठवी : ‘मोरेश्वरा, गणा गोंधळा ये!’ देवीची स्तुती व पूजा करण्याच्या एक प्रकार
By दा. कृ. सोमण | Published: September 28, 2017 4:46 AM