मानवता हाच खरा धर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 08:19 AM2019-09-09T08:19:58+5:302019-09-09T08:22:48+5:30
धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल.
ईश्वराने मानव निर्माण केला. म्हणून मानवतेकरिता मिळून-मिसळून राहणे, माणसाने माणसासाठी केलेले कर्तव्य म्हणजे धर्मपालन होय. मानवता हाच खरा धर्म आहे. धर्माबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील; परंतु मानवता हीच सर्व धर्माची शिकवण असेल. उपासना निरनिराळ्या रूपाची असेल, पण उपासनेची शक्ती अफाट आहे. कारण सगळ्याच धर्मात सत्याला किंमत आहे. सत्य हाच तुमचा खरा जीवन धर्म आहे. ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल. तोच धर्म मानाल. कोणताही धर्म असला तरी धर्माविषयी प्रत्येकाची श्रद्धा असावी. मानवता धर्म सर्वधर्माचा पाया आहे. सर्वांविषयी आदरभाव, प्रेम, आस्था, विश्वास असला पाहिजे. मन वेगवेगळ्या वाटांनी जायला निघते, तेव्हा त्या मनाचा विचार करून संकुचित भाव न ठेवता उदार व विशाल भाव ठेवावा. लोकांच्या मनात जो धर्माविषयी भेदभाव निर्माण होतो त्याचे कारण मानवता धर्म त्यांच्यात रुजला नाही. व्यवहारातला भेदभाव मिटविण्यासाठी धर्म आहे.
सगळ्यांनी आपले मन एक करायला शिका. धर्माविषयी संकुचित भावना ठेवू नका. आपल्या मनात सहयोगाची भावना विकसित करा. विज्ञानाच्या कसोटीवर उतरवणारा, विविधतेमध्ये एकता कशी नांदेल, हाच आपल्या भारतीयांचा प्रयत्न असतो. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, तोच खरा धर्म होतो. सत्य-न्याय, दया-अहिंसा याची जाणीव ठेवतो तोच खरा धर्म पाळतो. सत्याची जाणीव असलेला माणूस धर्माची व्याख्या सांगतो. सत्याशिवाय धर्म टिकू शकत नाही. आपण जेव्हा सत्याशी एकरूप होतो तेव्हा धर्माची खरी व्याख्या कळते. धर्माविषयी आस्था असणे, धर्माची चिकित्सा करणे, अशा काही गोष्टी काही माणसे करतात. धर्म म्हणजे कर्तव्य. आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे म्हणजे धर्माने वागणे होय. आपल्या भारत देशात अनेक जाती, अनेक धर्माचे लोक राहतात. तरीपण भारत देशात शांती आहे. कारण विविधतेत एकता ही भारताची मुख्य भूमिका आहे. सर्वसामान्य माणूस धर्माप्रमाणे वागतो. निश्चित तोच धर्म टिकवतो. काही जण समजतात, धर्म ही अफूची गोळी आहे. धर्माची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी केल्या असल्या तरी, मानवता हाच खरा धर्म आहे. मानवी मूल्य हीच धर्माची उभारणी करू शकतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)