ज्याने वाटेत काटे पसरविले त्यांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करणे हाच मोठेपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:26 AM2019-07-15T05:26:41+5:302019-07-15T05:26:52+5:30
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक मार्मिक प्रसंग असा आहे.
- प्रा. शिवाजीराव भुकेले
शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक मार्मिक प्रसंग असा आहे. एकनाथांच्या मनात क्रोध निर्माण व्हावा व त्यांचे गोदावरीचे नित्यस्नान चुकावे म्हणून कर्मठांनी एका ‘यवनास’ सुपारी दिली. नाथ जेव्हा गोदावरीच्या स्नानाला जातील तेव्हा त्यांच्या अंगावर थुंकायचे अशी अट ठरली. तो यवन नाथांच्या रस्त्यावर थोडासा उंचवट्यावर बसला, तोंडात तांबुलाचा विडा भरला व नाथ जवळ येताच नाथांच्या अंगावर पचकन पिचकारी मारली. त्याची अपेक्षा होती नाथ आता आकांडतांडव करतील. त्याला शिव्यांच्या लाखोल्या वाहतील, पण झाले मात्र उलटेच. नाथांनी साधे त्याच्याकडे वर मान करूनसुद्धा पाहिले नाही. असा प्रकार सलग १०८ वेळा झाला. नाथबाबा प्रत्येक वेळी गोदावरीत डुबकी मारत व परत आपल्या देवघरात जात. शेवटी यवन खजील झाला व झाला प्रकार नाथांच्या समोर कथन करून क्षमायाचना करू लागला. त्यावर नाथबाबा म्हणाले. ‘‘अरे वेड्या ! त्यात क्षमा कसली करायची, उलट तूच माझ्यापेक्षा खरा पुण्यवान आहेस. कारण तुझ्यामुळे मला गोदावरीचे १०८ वेळा स्नान घडले.’’ याला म्हणायचे क्षमाशास्त्राचा हिमालय. ज्याने वाटेत काटे पसरविले त्यांचे कल्याण होवो, अशी प्रार्थना करण्यासाठी मन आभाळापेक्षा मोठे व्हावे लागते. तरच दुसऱ्यांना क्षमा करण्याची सद्बुद्धी होते. आपल्या सर्वांगावर खिळे ठोकणाऱ्यांना आपण काय करतो, हेच कळत नाही म्हणून त्यांना ‘गॉड’ने प्रथम क्षमा करावी, अशी प्रार्थना करणारे येशू. इंद्रियांना जिंंकल्यानंतरच क्षमाशास्त्र हाती येते, असा संदेश देणारे भगवान महावीर. आपल्याला गावातून निष्कासित करणाºया कर्मठांचे त्यांच्या कर्र्म-धर्माने कल्याण होवो, अशी प्रार्थना करणारे तुकोबा युगा-युगातून एकदाच जन्माला येतात. जन्माला आल्यानंतरसुद्धा आपल्या क्षमेची जाहिरात न करता ते म्हणत राहतात -
क्षमाशास्त्र जया नराचिया हाती
दुष्ट तया प्रति काय करी ?
तृण नाही तेथे पडीला दवाग्नी । जय विझोती अपसया ।
तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप ।
माणसाचे मोठेपण त्याने किती लोकांना मनाने व तनाने ंमारले यावर अवलंबून नसते, तर त्याने अत्यंत उदार अंत:करणाने किती लोकांना क्षमा केली यावर अवलंबून असते. निर्जीव समजल्या जाणाºया मातीवर जर फुले पडली तर ती माती सुगंधित होते, तद्वतच महापुरुषांच्या प्रेमाचा हळुवार स्पर्श पामराच्या जीवनातही शीतलता निर्माण करू शकतो. म्हणूनच संतांनी आपल्या वाटेत काटे पेरणाºयांच्या जीवनातही फुले पेरली. संतांच्या मनातील क्षमाशास्त्राने पामरांच्या हातातील शस्त्रांना बोथटपणा आणल्यामुळेच अनेक खळ आपल्या तलवारी म्यान करून सन्मार्गाकडे प्रवृत्त झाले. जसे गवत नसलेल्या जागेवर जर अग्नी पडला तर कालांतराने आपोआप विझून जातो, तसे क्षमा नावाचे शस्त्र क्रोध नावाच्या अग्नीला विझवून टाकते. म्हणून लक्षात असू द्यावे की, जगातले कुठलेही शस्त्र जवळ बाळगले तर ते मनात क्रोध निर्माण करते, पण क्षमा नावाचे ‘शस्त्र’ ज्या वीर पुरुषाजवळ आहे, त्यावर शत्रूची व दुष्टाची काहीच मात्रा चालत नाही. म्हणून क्षमा हे केवळ साधूंचे भूषण नाही, तर ते वीर पुरुषांचे आभूषण आहे. ‘क्षमा’ हे दुर्बलांचे आशीर्वादाचे अस्त्र नाही, तर सबलांचे सर्वश्रेष्ठ शस्त्र आहे. जसे शरीर आपल्यावर पसरलेल्या सर्व रोमारोमांस संरक्षण देते, पण आपण त्यांचे रक्षण करतो याची वाच्यता करीत नाही. क्षमा ही अशीच असते, जिचे वर्णन करताना ज्ञानोबा माउली म्हणतात -
आता सर्वही साहायिता गरीमा । गर्वा नये तेचि क्षमा ।
जैसे देह वाहोनि रोमा । वाहणे नेणे ।