- इंद्रजीत देशमुखजगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना आणि साधनामार्ग यांच्या जोपासनेसाठी व्यक्ती निकोप असली पाहिजे. द्वेष, मत्सर, आकस, रोष अशा सात्त्विक प्रभावाच्या परिणामासाठी अभाव ठरणाºया गोष्टी अंतरी धरून आम्हाला कधीच साधना करता येणार नाही. हे सगळे उरी धरून साधनेचा प्रयत्न केलाच, तर ते निव्वळ साधनेचं नाटक ठरू शकतं. माउलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर,‘एरव्ही तरी पंडूसूता। आत शुद्ध नसता।बाहेरी करमु तो तत्त्वता। विटंबु गा।।’अशी अवस्था होऊ शकते. अशा प्रकारे अंतरी मालिन्य धरून दार्शनिक शालीन्य स्वीकारून व्यक्ती आपले आणि समाजाचे हित साधूच शकत नाही, म्हणून संतांनी आम्हाला वर्तन नियमन शिकवले आणि त्या नियमनाची अंमलबजावणी स्वत:कडून जगाकडे अशी अनुसरली. याच अनुसरणाचा बोध देताना तुकाराम महाराज म्हणतात,‘वेढा रे वेढा रे पंढरी। मोर्चे लावा भीमातीरी।।’इथं पंढरी वेढायला सांगतात. वास्तविक पंढरी म्हणजे पंढरपूर असंही म्हणता येईल; पण तात्त्विकदृष्ट्या आमच्या नाथरायांनी म्हटल्याप्रमाणे,‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।नांदतो केवळ पांडुरंग।।असा अर्थ इथं अपेक्षित आहे. आपल्या शरीररूपी पंढरीभोवती मोर्चा उभा करा. जेणेकरून भोवताली पतनासाठी उभ्या असलेल्या उपलब्धीमागे हे शरीर जाऊ शकणार नाही. वैयक्तिक आचरण नियमनाचा आग्रह धरण्यापाठीमागे संतांचा उद्देश असा असतो की, जगातील इतरांच्या बाह्य अभिनिवेशावर आपण विचलित होऊ नये. बाहेर भोवताली कोणतीही परिस्थिती असो, पण आपण विचलित व्हायचं नाही, असं संतांचं सांगणं आहे.
वेढा रे वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 4:58 AM