- बा.भो. शास्त्रीशके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो, असाही पाहिला. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला. अविचारातून बिमारीच्या नावाने खोकलाई, ठसकाई, जाखाई, जोखाई, मरीमाय असे देव निर्माण करणारा माणूस पाहिला. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला ठेला असे: याचे ठक फेडिता कवन नसे: तू ठकला ऐसे कुणी न पुसे’ हे बाराव्या शतकातले महाराष्ट्राचे चित्र होते. अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज सापडला. असत्याला सत्य व अधर्माला समजत होता. मूठभर लोकांनी अनेकांना फसविले, तेही फसले. याचे एकच कारण माणसाजवळ विचार नव्हता. विचाराची आवड नव्हती. विचाराने निवड नव्हती. अज्ञान व मिथ्या ज्ञानाने माणसे भरकटली, अस्थिर झाली. विचार माणसाला स्थिर करतो. विचाराने दृढता येते. निश्चलता येते. शांती क्रांतीने मिळत नाही. ती निश्चलतेने मिळते. हाच सल्ला संत ज्ञानेश्वर महाराज देतात,‘निश्चलत्वाची भावना, जरी नव्हेचि देखै मन तरी शांती केवी अर्जुना, आपु होय.’ म्हणून स्वामींनी प्रथम मराठीत मानवाला विचाराची बैठक दिली व ठकांपासून सांभाळून राहावे, म्हणून ज्ञानाचे डोळे दिले. सफरचंद काय एकाच न्यूटनच्या अंगावर पडले काय? कविट व नारळ पडून अनेकांच्या डोक्याला जखमा झाल्या असतील, पण जमिनीवर पडलेल्या फळाला खेचणारी शक्ती कोणती, ही शंका एकाच्याच मनात आली. कारण विचाराला जिज्ञासेची जोड मिळाली.
विचारे दृढता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:38 AM