आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 09:12 AM2019-07-08T09:12:52+5:302019-07-08T09:13:32+5:30

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो

wari gives path to life of spirit | आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

Next

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

आता सध्या वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात हा मोठा उत्सव आहे. ‘पंढरपूरची वारी’ हा अनेक पिढ्यांचा ठेवा आहे. न चुकता दरवर्षी वारी करणारी अनेक घराणी आहेत. वारकऱ्यांचा मूळ स्वभाव सात्त्विक होय. कारण वारी सात्त्विकतेतून येते. वारक-यांचे ‘मन’ निर्मळ असते. आपल्या मनाच्या भावछटा वारकरी वारीत व्यक्त करतो. प्राचीन काळापासून वारकरी एकनिष्ठेने राहातो. वारक-यांचे मन अढळ असते. आपल्या ध्येयासाठी तो जागृत असतो. स्व-तत्त्वाची त्याला जाणीव असते.

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो. दुस-याच्या सुखात आनंदाने सहभागी होणारा, छल-कपट न करणारा, वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमतो. मिळेल तेथे निवारा शोधणारा, पंढरीचा आवडता असणारा वारकरी जगण्याचे भान आणून देत असतो. वारक-यांचे मन पवित्र असते. चिखल, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तो आनंदाने माउलींसोबत चालतो. माउलींंवर विश्वास ठेवून जगत असतो.

कर्तृत्वाची मशागत करत असतो. प्रेमाची शिदोरी वाटत असतो. अंतर्बाह्य एका विठ्ठलाला शोधत असतो. वारक-यांच्या मनाची स्थिती, लय, गती विठ्ठल होऊन जाते. जगत्रूप विठ्ठलरूप आहे, असे समजून चालतो तो वारकरी. समानतेची बीजतत्त्वे वारीत सापडतात. धर्माची परिभाषा वारीत कळते. आत्मोद्धाराची वाट मोकळी होते. कर्म-धर्माची शिकवण वारीत मिळते. वारक-यांचे भांडवल म्हणजे प्राणिमात्रावर दया करणे. समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणे होय.

पाखंडी लोकांचे खंडण करणे. कर्मकांडाला छेद देणे, भागवत धर्माचा विस्तार करणे, हे वारकरी सातत्याने करत असतो. प्राचीन काळापासून-आधुनिक काळापर्यंत वारकरी तग धरत आहे. अनेक शासक आले तरी वारकरी मात्र डगमगला नाही. अढळपणे आपले कार्य करीत राहिला. वारक-यांचे मन कणखर असते. दया, धर्म, नीती, अहिंसा या मूल्यांचा तो पुरस्कर्ता आहे. सातत्य त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य असते. मनाची स्थिरता कशी करावी वारक-यांकडून शिकावे. वारक-यांचे मन अथांग सागरासारखे असते. अखंडितपणे मनाला सावरणारे असते. मनाचे मनपण वारीत कळते.

(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

Web Title: wari gives path to life of spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.