आनंद तरंग - जीवसृष्टीचे कल्याण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 02:25 AM2020-06-10T02:25:58+5:302020-06-10T02:26:25+5:30
अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत आणि ती इतरत्र अमलात आणताना अनेक दु:खं आणि संकटे ओढवून घेतली आहेत
सद्गुरू जग्गी वासुदेव
विकास आणि समृद्धी म्हणजे काय, हे आपण पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक आहे. समृद्धी म्हणजे केवळ जे आहे त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा अधिक, त्याहीपेक्षा अधिक असे नाही. आपल्याला जगण्यासाठी केवळ एकच ग्रह उपलब्ध आहे. आपण निरंतरपणे अधिक आणि अधिक पाहिजे याच्या मागे लागू शकत नाही. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांमधूनच प्रत्येकाचे कल्याण करण्याचे मार्ग समाजाने शोधून काढणे आवश्यक आहे. आशियामधील सर्वांत मोठे दु:ख म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये अनेक देशांनी पाश्चात्य देशांच्या समाजाने त्यांना कसे घडविले याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पूर्वेकडील लोकांचे विचार, भावना आणि कार्य करण्याच्या चौकटीत बसलेले नाही आणि त्यामुळे लोकांना भयंकर संघर्षाचा सामना करावा लागत आहे.
अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत आणि ती इतरत्र अमलात आणताना अनेक दु:खं आणि संकटे ओढवून घेतली आहेत. हे योग्य किंवा अयोग्य आहे हा प्रश्न मुळीच नाही. हा प्रश्न केवळ एखादी संस्कृती किंवा राष्ट्रासाठी काय सुसंगत असेल याचा आहे. इतिहासात प्रथमच, एक मानवजात म्हणून, आपल्याकडे पृथ्वीवरील लोकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने, तंत्रज्ञान व क्षमता उपलब्ध आहे. सर्वसमावेशक मानवी चैतन्य या एकाच गोष्टीचा अभाव जाणवतो. समाजाने अशा योग्य व्यक्ती निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे. जर सहृदय आणि करुणेने भरलेली अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल, जेथे प्रत्येक मनुष्याला आपले कार्यकौशल्य वापरता येऊ शकते, तर हे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक धोरणे अधिकाधिक सर्वसमावेशकतेच्या जाणिवेतून आली पाहिजेत. मुख्यत: प्रत्येक मनुष्याने पृथ्वीवरील सर्व जिवांच्या कल्याणाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हेच मूलभूत धोरण असले पाहिजे.