- प्रा. शिवाजीराव भुकेलेआपल्या भारतीय जनमानसात ज्या अनेक कपोलकल्पित कल्पना अगदी खोलवर ठाण मांडून बसल्या आहेत; त्यातील एक कल्पना म्हणजे ‘स्वर्गवासी’ होण्याची कल्पना होय. असे म्हणतात की, शंभर वेळा उच्चकुळात जन्म घेऊन जो शुद्ध कर्म करतो तो स्वर्गस्थ ब्रह्मा होतो, तर शेकडो यज्ञ निर्विघ्नपणे पूर्ण करणारा इंद्रपदाचा अधिकारी होऊन स्वर्गलोकी ऐरावतावर आरूढ होतो; पण असे किती स्वर्गवासी ब्रह्मा आणि इंद्र स्वर्गात नेमके काय करतात, याचा पत्ता अजून कुणालाच लागलेला नाही. मुळात जो स्वर्गलोक अस्तित्वातच नाही, त्याचा पत्ता लागेलच कसा? जर सकाम पुण्याईच्या राशी रचणारे जीवात्मे स्वर्गाला गेले असते तर कधीतरी त्यांनी आपला स्वर्गीय साक्षात्कार दिला असताच ना ! ज्ञानेश्वर माउली तर म्हणतात,जे नाहीं तयाते चिंतवी । तेचि नेईजें गंधर्वी ।गेलीयाची कवणे गांवी । शुद्धी न लगे ॥आतापर्यंत आपले पूर्वज नेमके कोणत्या गावी गेले याचा पत्ता अजून लागलेला नाही. खरं तर ते काय? अन् आपण काय; ज्या पृथ्वी, वायू, तेज, जल, आकाश या पंचतत्त्वांतून निर्माण होतो, त्याच पंचतत्त्वांत विलीन होतो. आपण कुठे स्वर्गालाही जात नाही आणि कैलासवासीही होत नाही; या देहतत्त्वाच्या विलीनतेचे वर्णन करताना संत कबीरानेही म्हटले होते,।। जल में कुंभ हैं, कुंभ में जल हैं, बाहर भितर पानी ।फुटा कुंभ जल-जलही समाया यह तथ कहैं ग्यानी ॥जसे गाडग्यातील जलाकाश जलात विलीन व्हावे व गाडगे फुटले की ज्या मातीतून ते निर्माण झाले; त्या मातीत मिसळून जावे तसे होते या देहरूपी गाडग्याचे. मग ही स्वर्गाची कल्पना नेमकी आली तरी कुठून, हा प्रश्न संत गाडगेबाबांनी स्वत:च्या कर्तृत्वानेच निकाली काढला होता. बाबा एकदा एका तीर्थक्षेत्री गेले. नदीच्या काठावर बसून पंडित मंडळी स्वर्गसुखाचे मंत्र म्हणत होते. नदीपात्रात भोळे भाविक दिवे सोडून स्वर्गाकडे पाणी शिंंपडत होते. बाबांनी विचारले, ‘हे आकाशाकडे पाणी का शिंंपडतात. आभाळच जर पाणी देते तर आभाळाला पाण्याची काय गरज?’ पंडित म्हणाले, ‘अरे, हे स्वर्गातील पितरांची तहान भागविण्यासाठी हे स्वर्गाकडे पाणी शिंंपडत आहेत. तुझ्या पूर्वजांची तहान भागवायची असेल तर तूही तसे कर. बाबा नदीपात्रात उतरले आणि ओंजळीत पाणी घेऊन विदर्भाच्या दिशेने शिंंपडू लागले. बराच वेळ हा प्रकार चालल्यानंतर पंडित तावातावाने उद्गारले, ‘अरे ! हा काय मूर्खपणा करतोस? मी तुला पाणी कुठल्या दिशेने शिंंपडायचे सांगितले अन् तू कुठल्या दिशेने शिंंपडतोयस.’ त्यावर गाडगेबाबा म्हणाले, ‘माझ्या गावाला बारा महिने दुष्काळ आहे; निदान येथून पाणी शिंंपडले अन् गावाकडच्या एखाद्या माणसाच्या तोंडात पडले तर तो मरता-मरता वाचेल.’ पंडित लालबुंद झाले आणि म्हणाले, ‘या तीर्थक्षेत्रापासून तुझे गाव शेकडो मैल दूर आहे. एवढेसे ओंजळभर पाणी तिकडे शिंंपडण्याचा मूर्खपणा कशाला करतोस?’ अशा वेळी विवेकवादाचे खुले व्यासपीठ संत गाडगेबाबा म्हणाले, ‘महाराज, इथून शिंंपडलेले पाणी जर शंभर-दोनशे मैलावरच्या माझ्या गावापर्यंत जात नाही तर जो स्वर्ग तुमच्या माझ्या कुणाच्याच बापजाद्यांनी बघितला नाही त्या स्वर्गापर्यंत जाईलच कसे?’ परंतु गाडगेबाबांचा हा डोळस उपदेश झोपेचे सोंग घेतलेल्या महाराष्ट्राला पचलाच नाही. कारण आजही स्वर्गसुखाच्या कल्पनेपोटी अनेक कर्मकांडांना ऊत येत आहे. संत ज्ञानेश्वरांनी या वाटांना चोरवाटा असे संबोधन देऊन म्हटले होते,मज येंता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हाटा ।स्वर्गु नरकु या वाटा चोराचिंया ॥
स्वर्गु-नरकु या वाटा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 5:27 AM